
नांदेड – नांदेडमध्ये अवैध सावकारी व्यवसाय करून पैसे परत न करणाऱ्या लोकांना डांबून ठेवून खंडणी मागणाऱ्या गुन्ह्यातील पाच जणांना स्थानिक गुन्हा शाखेने अवघ्या तीन तासात बेड्या ठोकल्या आहेत. यातील चौघेजण फरार असून गुन्ह्यात एका विधी संघर्षग्रस्त बालकाचाही यामध्ये समावेश आहे. या पाचही जणांना स्थानिक गुन्हा शाखेने पुढील कारवाईसाठी भाग्यनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
भाग्यनगर आणि अर्धापूर पोलीस ठाण्यांतर्गत सावकारी अधिनियमांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी हे साठे चौकाजवळ खालचा फायनान्स गुरुकृपा ट्रेडर्स येथील ऑफिसच्या बाहेर थांबलेले असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हा शाखेचे पथक तेथे पोहोचले. तेथे मजहर खान नवीद खान वय ३८ रा. अमन कॉलनी नुरी चौक माळ टेकडी रोड, अभिजीत प्रकाश सूर्यवंशी वय १८ वर्षे रा. विष्णूनगर, सुमित रामदास ढवळे वय २२ वर्षे, रा. संघसेनगर इतवारा, अभय गौतम भुजबळे वय १९ रा. गौतमनगर किल्ला रोड आणि अनिकेत राजू हिरापूरम वय १८ वर्षे रा. नारायण नगर या पाच जणांना पकडले. हे सर्वजण खालसा फायनान्समध्ये खाजगी नोकरी करतात. त्यांनी पीरबुऱ्हाण नांदेड येथील आबेद अली चाऊस यांच्याकडील फायनान्सची वसुली करण्यासाठी २८ मार्च २०१६ रोजी त्यांच्या घरी गेले. ते फायनान्सचे पैसे देत नसल्याने त्यांना जबरदस्तीने मोटरसायकलवर बसून खालसा फायनान्स ऑफिसमध्ये मारहाण करून डांबून ठेवले. त्याचवेळी अर्धापूर येथून समाधान जोंधळे यांनाही मारहाण करून ऑफिसमध्ये डांबून ठेवले. त्यांना पैसे दिल्यानंतर सोडून दिले. हे दोन्ही गुन्हे त्यांनी सोहेल खान रा. नुरी चौक, सय्यद आजम रा. इस्लामपुरा, शुभम कांबळे रा. श्रावस्ती नगर आणि मॉन्टेसिंघ मेजर फायनान्स मालक तसेच एक विधी संघर्षग्रस्त बालक यांच्यासह मिळून केल्याची कबुली दिली. या प्रकरणात अर्धापूर आणि भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहितीही पुढे आली आहे. स्थानिक गुन्हा शाखेने पकडलेल्या पाचही जणांना भाग्यनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे, साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार पोकॉ. माधव माने, श्रीराम दासरे, संघरत्न गायकवाड, मनोज राठोड, बालाजी कदम, प्रमोद जोंधळे, इम्रान शेख, संदीप घोगरे, पोकॉ घेवारे, सुधाकर देवकते, महेश बडगु यांनी सायबर सेलची तांत्रिक मदत घेऊन केली.
दुसरीकडे नांदेड शहरात गल्लोगल्ली असे खाजगी फायनान्स चालक वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून आपला फायनान्सचा धंदा चालवीत आहेत. यातील किती फायनान्स हे परवानाधारक आणि किती फायनान्स हे अनाधिकृतरित्या चालतात याची पडताळणी करण्यासाठी पोलीस दलाला विशेष मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. या खाजगी फायनान्स चालकाकडून अनेक सामान्य नागरिकांना लुबाडले जाते. दिलेली रक्कम आणि वसूल केलेली रक्कम यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. चक्रवाढ व्याज पद्धतीने ही वसुली सामान्य नागरिकाकडून होत असते. गरज पडल्याने हे सामान्य नागरिक थेट अशा फायनान्स चालकांच्या गळाला लागतात आणि पुढे अक्षरशः घरातील साहित्य विकूनही त्यांची रक्कम परत करणे त्यांना शक्य होत नसते. त्यामुळे त्यांना अशा फायनान्स चालकाच्या वसुली करणाऱ्या लोकांकडून कुटुंबातील सदस्यांसमोरच अपमानित करून मारहाणही केली जाते. अशा पार्श्वभूमीवर अनेक संसार उध्वस्त झाल्याचे चित्रही आहे.



