महापालिका

किवळा साठवण तलावाच्या माध्यमातून नांदेडकरांना आणखी एक प्रमुख जलस्त्रोत उपलब्ध..

तरंगत्या पंप हाऊसद्वारे १५ मेपासून असदवन येथे पाणी आणले जाणार, अमृत २.० योजनेत नांदेड शहरात १७५ कोटींची कामे सुरू 

नांदेड – नांदेड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी किंवा साठवण तलावाच्या माध्यमातून आणखी एक प्रमुख जलस्त्रोत उपलब्ध झाला आहे. या किवळा साठवण तलावातून तरंगत्या पंप हाउसद्वारे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असदवन जलशुद्धीकरण केंद्र येथे पाणी घेण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जात आहे. या साठवण तलावातील पाण्यामुळे नवीन नांदेडकरांची तहान उन्हाळ्यातही भागविली जाणार आहे. त्याचवेळी नांदेडकरांना पिण्याच्या पाण्यासाठी आणखी एक प्रमुख जलस्त्रोत उपलब्ध होणार आहे.
नांदेड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी गुरुवारी शहरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना योजनेचा आढावा घेतला. केंद्र शासनाच्या अमृत 2.0 या योजनेअंतर्गत नांदेड शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचे बळकटीकरण आणि संलग्नीकरण करणे हे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी १७५ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. ९ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू झालेल्या याच योजनेतील कामांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या योजनेअंतर्गत नांदेड शहरात २०० किलोमीटर अंतरात जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. काळेश्वर येथील पंपगृहाचेही आधुनिकीकरण केले जाणार आहे यासाठी जवळपास १२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कोटीतीर्थ ते डंकीनपर्यंत स्वतंत्र जलवाहिनी टाकून पाणी डंकीनपर्यंत आणले जाणार आहे हे काम जवळपास पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. डंकिन येथेच ३५ दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्पही उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी ९ कोटी २३ लाख रुपये खर्च येणार आहे. हे कामही सुरू करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत शहरात नऊ जलकुंभही बांधण्यात येत आहेत. अविरत पाणीपुरवठा साठी सोलर पावर प्लांटही बसवण्याचे निश्चित करण्यात आले असून यासाठी आठ कोटी दहा लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. अमृत 2.0 योजनेअंतर्गत आसना नदीवर गेट बसवण्यात येणार आहेत. यासाठी जवळपास अडीच कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत शहरातील कामांना गती द्यावी, असे आदेश स्थायी समिती सभापती गाडीवाले यांनी यावेळी दिले. त्याचवेळी ही कामे दर्जेदार व्हावीत यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशा सूचनाही दिल्या. शहरातील कोणत्याही भागात पाणीटंचाई होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी, आगामी काळातील उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही सभापती गाडीवाले यांनी दिल्या आहेत. बैठकीसाठी सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे, माजी स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, संतोष मुळे यांच्यासह शहर अभियंता सुमंत पाटील, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, उपअभियंता प्रकाश कांबळे आदींची उपस्थिती होती.
नांदेड महापालिका विष्णूपुरी प्रकल्प, आसना नदीवरील पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे नांदेडकरांची तहान भागवते. आता किवळा साठवण तलावातूनही नांदेड महापालिकेला पाणी उपलब्ध होणार आहे. हे पाणी घेण्याची तयारी महापालिकेने पूर्ण केली आहे. किवळा साठवण तलावापासून ते असदवन जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकून पाणी आणले जाणार आहे. पुढे या शुद्धीकरण केंद्रातून पाण्याचे वितरण नवीन नांदेड भागात केले जाणार आहे.

नांदेड महापालिकेने प्रभाग क्रमांक १९ येथे रवी नगर भागात २४ तास पाणीपुरवठा सुरू केला आहे. प्रायोगिक तत्त्वावरील या पाणीपुरवठा उपक्रमामुळे आता नांदेडकरांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात उंचावल्या आहेत. प्रभाग १९ मध्ये सुरू केलेला प्रयोग आमच्या प्रभागात का केला जात नाही? असा प्रश्न प्रत्येक प्रभागातील नागरिक विचारात आहेत. अनेक नगरसेवकांनीही पाणीपुरवठा विभागाला आमच्या प्रभागातही २४ तास पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी केली आहे. नांदेडकरांच्या या वाढत्या अपेक्षा पाहता आता महापालिकेलाही ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!