क्राईम

नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयातील ‘त्या’ सुरक्षा रक्षकांचा अहवाल मागविला..!

'मेस्को'च्या २३९ जवानांकडे रुग्णालय सुरक्षेची जबाबदारी..!, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांची माहिती, पोलीस अन् सुरक्षा रक्षकासमोरच झाली होती एका युवकाची निर्घृण हत्या

नांदेड – नांदेडमध्ये शुक्रवारी भारत ई-स्क्वेअरजवळ गॅंगवॉरमधून झालेल्या समोरासमोरील चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्यानंतर अन्य एका जखमीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र रुग्णालयात पोहोचताच त्याच्यावर पोलिस आणि विष्णूपुरी शासकीय रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीतच जीवघेणा हल्ला होतो. या हल्ल्यात तो युवक प्राण गमावतो. यावेळी पोलीस आणि सुरक्षारक्षक केवळ बघायची भूमिका घेत असल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी या सुरक्षारक्षकांचा अहवाल मागविला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘मेस्को’ शासकीय रुग्णालयातील उपस्थित सुरक्षा रक्षकांचा अहवाल मागविला पण त्याचवेळी एक पोलीस वगळता इतर बघ्याच्या भूमिकेत असलेल्या पोलिसांचे काय हा प्रश्न हे आता पुढे आला आहे.
नांदेडमध्ये तीन दिवसात पाच खून झाल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. नांदेडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा अर्जितसिंघ चव्हाण आणि त्याचे दोन मित्र हे ई-स्क्वेअरमधून बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर साई लाला गॅंगचे सदस्य महंमद अरबाज आणि सय्यद अवेज तसेच इतरांनी जीवघेण हल्ला केला. या हल्ल्याचा अर्जितसिंघ आणि त्याच्या मित्रांनी प्रतिकार केला. या मारहाणीत अर्जितसिंघ आणि मोहम्मद अरबाज हे दोघेही जागीच मरण पावले. पण जखमी अवस्थेतील सय्यद आवेज याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले; मात्र तिथे अर्जितसिंघचा भाऊ बदल्याच्या तयारीतच होता. सय्यद आवेज याला रुग्णवाहिकेतून बाहेर काढताच त्याच्यावर चाकू हल्ला केला. या सर्व घटनेचा व्हिडिओ दोन दिवसानंतर समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.
नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तर पुन्हा एकदा सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एका युवकावर निर्दयीपणे चाकू हल्ला होत असताना केवळ बघ्याची भूमिका घेणाऱ्या पोलीस आणि सुरक्षा रक्षकांच्या भूमिकेप्रती एकूणच समाजातील प्रत्येक जण संताप व्यक्त करीत आहे. या सर्व प्रकाराबाबत नांदेडच्या शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत चिंता व्यक्त केली. तेथे उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करणे आवश्यक होते; मात्र तिथे तसे झाले नाही हे व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्ट होते. या सर्व प्रकाराचा आपण अहवाल मागितला असल्याचेही त्यांनी ‘नांदेड स्क्रिप्ट’शी बोलताना सांगितले.

‘मेस्को’च्या २३९ जवानांकडे रुग्णालय सुरक्षेची जबाबदारी..!. नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘मेस्को’च्या महाराष्ट्र एक्स सर्व्हिसमेन कॉर्पोरेशनचे २३९ जवान सुरक्षेची जबाबदारी पाड पाडत आहेत. घटनेच्या दिवशीही अपघात विभागात जवळपास ८ ते सुरक्षा रक्षक कार्यरत होते. चाकूहल्याचा व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्येही जवळपास चौघेजण घटनास्थळी असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. घटनेचा व्हिडिओही या जवानाच्या अगदी जवळून घेतला असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यात हे सुरक्षा रक्षक केवळ आणि केवळ मुकदर्शकच बनले असल्याचे दिसून येत आहे. एक पोलीस कर्मचारी मात्र युवकाला वाचवण्याचा अगदी तळमळीने प्रयत्न करीत असल्याचेही दिसत आहे. एरव्ही रुग्णालयात आलेल्या सामान्य नागरिकांवर खेकसणाऱ्या या सुरक्षा रक्षकांची कर्तव्य भावना कुठे गेली होती हा प्रश्न पुढे आला आहे. शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. देशमुख यांनी आता या सर्व प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. त्या अहवालावर पुढे काय कारवाई होते, याची प्रतिक्षा आहेच.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!