क्राईम

नांदेडमधील चार बालकांच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वतःहून घेतली दखल..!

महापालिका आयुक्त, नांदेड जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून घटनेबाबत दोन आठवड्यात मागितला सविस्तर अहवाल, ठेकेदाराला वाचविण्याच्या प्रयत्नांचा पुन्हा होणार उहापोह..!

नांदेड – नांदेड शहरात जुन्या नांदेडातील इस्लामपुरा भागात सुरू असलेल्या एका नाल्याच्या कामात १६ एप्रिल रोजी चार बालकांचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणात मुख्य ठेकेदाराला वाचविण्याची भूमिका घेतली जात असल्याचा चौफेर आरोप होत असतानाच आता या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने माध्यमातील वृत्तांवरून स्वतः दखल घेतली आहे. आयोगाने महापालिका आयुक्त, नांदेडचे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना नोटीस पाठवून दोन आठवड्यात या घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता नांदेडच्या या घटनेची नोंद राष्ट्रीय स्तरावर झाली असून महापालिकेने मुख्य ठेकेदाराला वाचवण्यासाठी घेतलेल्या भूमिकेचा पुन्हा एकदा उहापोह होणार आहे.
महाराष्ट्रातील नांदेड शहरात इस्लामपुरा परिसरात नाल्याच्या कामाच्या ठिकाणी खोल खड्ड्यात बुडून चार मुलांच्या मृत्यूच्या वृत्ताची भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) स्वतःहून दखल घेतली आहे. आयोगाच्या असे निदर्शनास आले आहे की, पीडितांच्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा गंभीर मुद्दा उपस्थित होतो. नांदेड वाघाळा महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दोन आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल मागवणारी नोटीस बजावली. अहवालामध्ये मृताच्या आरोग्याची स्थिती आणि मृताच्या नातेवाईकांना दिलेली नुकसानभरपाई (असल्यास) यांचा समावेश असावा असेही नमूद केले आहे. १६ एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्रातील नाल्याच्या कामाच्या ठिकाणी, इस्लामपुरा परिसरात १५ फूट खोल खड्ड्यात बुडून चार मुलांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा नाला स्थानिक महापालिकेकडून बांधला जात असून, जवळच्या खड्ड्यात सांडपाणी साचले होते. १७ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या मीडिया रिपोर्टनुसार, मुले घटनास्थळाजवळ खेळत होती आणि पाण्याची खोली लक्षात न घेता ती पाण्यात उतरली. त्यांचा आक्रोश ऐकून स्थानिक रहिवासी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलांना वाचवता आले नाही.
दरम्यान, या प्रकरणात नांदेड महापालिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. देगलूर नाका परिसरातील एमजीआर गार्डनच्या पाठीमागे इस्लामपुरा भागात खड्यात साचलेल्या पाण्यात बुडुन चार शाळकरी मुलांचा दुर्देवी मृत्यु झाला. सदरील प्रकरणी महानगरपालिकेने नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही केली आहे. सदरील प्रकरणात चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मिर्झा फरहतउल्ला बेग यांची व्दिसदस्यीय समिती घटनेच्या दिवशीच नेमण्यात आली होती. समितीला २४ तासांच्या आत अहवाल देण्यासाठी आदेशीत करण्यात आले होते. चौकशी समितीने २४ तासांच्या आत सादर केलेल्या अहवालानुसार कामामध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे शिवकन्या जायभाये, उप अभियंता (सा.बा.वि.) आणि किरण सुर्यवंशी कनिष्ठ अभियंता (सा.बा.वि.) यांना तात्काळ निलंबीत करण्यात आले आहे. तसेच महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री दिलीप टाकळीकर, प्र.कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभागातील प्रकाश कांबळे, उप अभियंता व म.जकीउल्ला खान यांना कामात निष्काळजीपणा केल्याबाबत निलंबीत का करण्यात येवू नये ? याबाबत कारणे दाखवा नोटीस दिली.

पोलीस स्टेशन इतवारा यांनी १६ एप्रिल रोजी घडलेल्या घटनेच्या अंनुषंगाने मागविलेल्या लेखी माहितीनुसार १७ एप्रिल रोजी सदर प्रकरणाची माहिती पुरविण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी शहर अभियंता यांना प्राधिकृत केल्यानुसार शहर अभियंता यांनी १८ एप्रिल रोजी कंत्राटदार मे.गुरु रामदास कंस्ट्रक्शन, नांदेड यांचे संबंधीत पर्यवेक्षक सुरेश शेषेराव सोनकांबळे तसेच नाल्याचा प्रवाह मुरुम साहित्याचा भरणा करुन रोखणारे खाजगी बांधकामधारक मो.युसुफ मकरानी यांच्याविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणात  दुर्घटनेस जबाबदार असलेले कंत्राटदार मे.गुरु रामदास कंस्ट्रक्शन, नांदेड यांना दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यासाठी निर्देशीत केल्यानुसार संबंधीत कंत्राटदाराने मयत मुलाच्या नातेवाईकास प्रत्येकी १५ लाख याप्रमाणे एकूण ६० लाख रुपये नुकसान भरपाई दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!