क्राईम

नांदेडमध्ये अंतर्गत वादातून आणखी एक खून..!

नव्या एलसीबी प्रमुखाला गुन्हेगाराची सलामी, गुन्हेगारीवर आळा घालण्यात भाग्यनगर पोलिसांना अद्यापही अपयशच

नांदेड – नांदेड शहरात शुक्रवारी रात्री आणखी एक खुनाची घटना उघडकीस आली आहे. अंतर्गत वादातून चाकूने भोसकून हा खून करण्यात आला. यामुळे पुन्हा एकदा भाग्यनगर ठाणे हद्दीतील गुन्हेगारी ऐरणीवर आली आहे. सलग ५ खुनाच्या घटनानंतर शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा पोलिसांनी काही दिवसापूर्वीच आर्म ॲक्ट अंतर्गत ताब्यात घेतलेल्या अट्टल गुन्हेगाराने आपल्या मित्रांना सोबत घेऊन एकाचा पाठलाग करून खून केला.
शहरातील पावडेवाडी परिसरातील नवी वाडी येथील प्रताप दत्ता गायकवाड यांचा पाठलाग करून सोनू ऊर्फ अनिकेत सदाशिव बुक्तरे याने पूर्व वैमनस्यातून चाकूने भोसकून खून केला आहे. ही घटना शहरातील सम्राट वाईन मार्टसमोर शुक्रवारी रात्री उशिरा घडली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस दलातील प्रमुख अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट घेऊन आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सोनू बुक्तरे याच्यासह विजय वायवळ यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेतील सोनू बुक्तरे हा अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला तीन चार दिवसांपूर्वीच पोलिसांनी आर्म ॲक्ट अंतर्गत ताब्यात घेतले होते. कारवाईनंतर त्याला सोडताच त्याने पाठलाग करून एकाचा खून केला आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर असलेली पोलिसांची जरब कमी होत असल्याचेच स्पष्ट होत आहे.

मागील काळात स्थानिक गुन्हा शाखेने केलेल्या कामगिरीने अनेक अट्टल गुन्हेगारांनी चक्क नांदेड सोडून पळ काढला होता. आजघडीला पोलिसांची ही जरब नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतही निर्माण झाली आहे. ग्रामीण हद्द सोडून गुन्हे केले जात आहेत. नांदेड शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांना ठाण्यामध्ये नियुक्ती देण्याची गरज आहे. यासाठी खांदेपालट होणेही गरजेचे दिसत आहे. यात राजकीय हस्तक्षेप न झाल्यासच या नियुक्त्या योग्य पद्धतीने होऊ शकतील. नाहीतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशीच परिस्थिती निर्माण होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!