क्राईम

बिलोली तालुक्यातील बहुचर्चित सगरोळी येथे हायवा ट्रकने एकाला चिरडले..!

ओव्हरलोड हायवाची गती बिलोली तालुक्यासाठी ठरतेय जीवघेणी, महसूल, आरटीओसह पोलीस प्रशासनाचीही चुप्पी

नांदेड – बिलोली तालुक्यातील बहुतांशी घाटावरून होत असलेली ओव्हरलोड वाळू वाहतूक जीवघेणी ठरत आहे. शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सगरोळी येथील अनुसयानगर भागाच्या पायथ्यास एका चाळीस वर्षीय व्यक्तीला भरधाव वेगातील हायवा ट्रकने अक्षरशः चिरडले. या अपघातातील मयत विठ्ठल गोविंदराव लवटे यांच्या शरीराचा अक्षरशः चिखल झाला होता. अपघातानंतर नागरिक संतप्त झाले; मात्र या संतापाची दखल घेणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सगरोळी येथील अनुसया नगरात राहणारे विठ्ठल गोविंदराव लवटे वय ४० वर्षे हे शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास रस्त्याने जात असताना त्यांना एम एच २० सी ०७९३ क्रमांकाच्या वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकने चिरडले. अपघातात त्यांच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. ते जागीच ठार झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. या अपघात प्रकरणी हायवा ट्रक चालक सुलतान इस्माईल शेख याच्याविरुद्ध बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हा हायवा ट्रक ताब्यात घेतला असल्याची माहिती पुढे आली आहे.

 गेल्या दोन वर्षातील सगरोळीतील हा दुसरा बळी ठरला आहे. मुख्य रस्त्यावरच यापूर्वी एका तरुणाला हायवा ट्रकने चिरडले होते. गतवर्षी कुंडलवाडी येथेही एका वृद्धाला वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने त्याला जीव गमवावा लागला होता. एकूणच तालुक्यात होत असलेली ओव्हरलोड आणि बेलगाम वाळू वाहतूक प्रशासकीय यंत्रणेच्या नाकावर टिच्चून होत आहे. त्यांच्यावर लगाम घालण्यासाठी कोणतीही यंत्रणा पुढे येत नाही यातच सर्व काही स्पष्ट होत आहे. बिलोली तालुक्यात जात असलेले बळी हे प्रशासकीय बळी म्हटले तरी ते वावगे ठरू नये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!