
नांदेड – खाजगी शिकवणीच्या माध्यमातून शिक्षणाचा अक्षरशः बाजार मांडलेल्या नांदेडमध्येही आता नीट पेपरफुटीचे धागेदोरे पोहोचले आहेत. शनिवारी सीबीआयच्या पथकाने नांदेड शहरातील विद्युतनगर येथे कदम कुटुंबाची चौकशी केली. ही चौकशी तब्बल आठ तासाहून अधिक काळ चालली. या चौकशीनंतर आता सीबीआयने या प्रकरणातील संशयित पाल्याला तसेच विद्यार्थिनीलाही अधिक चौकशीसाठी मंगळवारी पुण्याला पाचारण केले आहे. त्यामुळे पुढील चौकशीनंतर नांदेडमध्येही या प्रकरणात आणखी कोण कोण अडकले आहे याचा निश्चितपणे उलगडा होणार आहे.
लातूर आणि नांदेडमध्ये कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या मोटेगावकर याची सीबीआयने लातूरमध्ये त्याच्या निवासस्थानी चौकशी केली. त्यानंतर सीबीआयचे पथक नांदेडमध्येही धडकले. सीबीआयच्या पथकाने नांदेड शहरातील विद्युतनगर भागात एका कुटुंबाची चौकशी केली. कदम कुटुंबियांच्या निवासस्थानी तब्बल आठ तासांपेक्षा जास्त वेळ कसून चौकशी करण्यात आली. कदम यांनी मुलीसाठी ५ लाख रुपयांत नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यानुसार सीबीआयच्या पथकाने शनिवारी सकाळीच विद्युतनगर भागातील कदम यांच्या फ्लॅटवर छापा टाकला. या पथकाने सकाळपासूनच घरातील सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली. कदम यांनी आपल्या मुलीसाठी ५ लाख रुपये देऊन नीटचा पेपर विकत घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. नांदेडमधून सध्या तरी कोणालाही अटक करण्यात आली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या दहा वर्षाहून अधिक काळात नांदेडमध्ये कॉलेज शिक्षणाची परंपरा मोडीत काढत खाजगी कोचिंग क्लासेसने अक्षरशः शिक्षणाचा बाजार मांडला आहे. खाजगी कोचिंग क्लासेसच्या या बाजारातील कोट्यावधींच्या उलाढालीने नांदेडच्या नामांकित कॉलेजनेही नांग्या टाकल्या. जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांनी या खाजगी कोचिंग क्लासेसपुढे पायघड्या अंथरल्या होत्या. नांदेडसह शेजारील लातूर जिल्ह्यातील तसेच देशभरातील कोचिंग क्लासेसने या शिक्षणाच्या बाजार मांडत नांदेडमध्ये अक्षरशः धमाकूळ घातला. त्याचेच दुष्परिणाम आता हळूहळू पुढे येत आहेत.
का केली सीबीआयने चौकशी..? नांदेडमध्ये तयारी करीत असताना सदर विद्यार्थीनीला केवळ १०० ते १२० गुण मिळत होते. त्यानंतर पेपर संदर्भात लिंक लागल्यानंतर सदर विद्यार्थीनी आणि तिची आई १५ दिवसांसाठी पुण्यात तयारीसाठी गेले होते. त्यानंतर नीट परिक्षा झाली आणि त्याच विद्यार्थीनीचा स्कोअर ५६० येवू लागला. त्यावरुन सीबीआयने चौकशी केली असल्याचे सांगण्यात आले. मंगळवारीही पुण्याला या दांपत्यासह मुलीला पाहणेही करण्यात आले आहे त्यामुळे आता या पुढील चौकशीत नेमके काय काय आढळते हे पाहणेही औत्सुक्याचे ठरले आहे.



