क्राईम

नांदेड ग्रामीण पोलिसांनी जप्त केला ३० लाख ६३ हजार रुपयांचा गुटखा 

बोलेरो जीपचा पाठलाग करून तेलंगणातून आणलेला गुटखा पकडला, जीप चालकास दोन दिवसांची पोलीस कोठडी

नांदेड – तेलंगणा राज्यातून नांदेडमध्ये आणला जात असलेला तब्बल ३० लाख ६३ हजार रुपयांचा गुटखा नांदेड ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे. शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी जीप चालक रईस मोहम्मद अमीर मोहम्मद याला अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. नांदेडमध्ये हा  गुटखा कोणासाठी आणला होता याचाही तपास पोलिसांनी करणे गरजेचे आहे. ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

शनिवारी सायंकाळी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी टापरे चौक परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना गुप्त माहिती मिळाली. एक महिंद्रा कंपनीची बोलोरो जीप गाडेगाव रस्त्याने बोंढार बायपास हायवेवरून नांदेड शहरात जाणार आहे. त्यामध्ये बंदी घातलेला गुटखा, सुगंधित पान मसाला बेकायदेशीर रित्या नेला जात आहे. या माहितीवरून ग्रामीण ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कांदा मार्केट चौक, नांदेड येथे सापळा रचून महिंद्रा कंपनीची एम एच ३७ टी ३६०१ क्रमांकाची बोलेरो जीप थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने भरधाव वेगात जीप पुढेच नेली. त्यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याचे वाहन ताब्यात घेऊन त्या वाहनातील विविध कंपन्यांचा पान मसाला, गुटखा जप्त केला आहे. या जप्त केलेल्या गुटख्याची किंमत ३० लाख ६३ हजार ६५० रुपये इतकी आहे.

याप्रकरणी पोलिसांनी रईस मोहम्मद अमीर मोहम्मद या जीप चालकाला अटक केली आहे. तो आदिलाबाद जिल्ह्यातील शांतीनगर येथे राहणारा आहे. त्याला पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, उपनिरीक्षक व्यंकट कुसमे पोलिस अंमलदार  मारुती पचलिंग, शंकर माळगे, धम्मपाल कांबळे यांनी केली. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

नांदेडमधील आका कोण..? तेलंगणा राज्यातून आणलेला हा ३० लाखांचा गुटखा नेमका कुणासाठी आणला होता याची माहिती पोलिसांना आता शोधावी लागणार आहे. गुटखा मागवणारा नेमका आका कोण आहे याचा तपास पोलिसांना करून त्याच्याविरुद्धही कारवाई करावी लागणार आहे. तेलंगणा राज्यातून नांदेडमार्गे हिंगोली, परभणी या जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी केली जाते. गुटखा तस्करीची एम एनही साखळी मोडून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!