
नांदेड : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस आज सोमवारी प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी या निवडणुकीत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्याचवेळी ९ इच्छुकांनी ३२ अर्ज नेले असल्याची माहितीही पुढे आली. १ जून ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे तर अर्ज माघारी ४ जून रोजी होणार आहे. दरम्यान या निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त नोडल अधिकारी व त्यांच्या सहाय्यकांचे प्रशिक्षण सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडले.
सलग दोन निवडणुका जिंकणाऱ्या अमर राजूरकर यांचा कार्यकाळ २०२२ मध्ये संपल्यानंतर ही निवडणूक झाली नव्हती. या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता या निवडणुकीत राजूरकर यांना पुन्हा उमेदवारी मिळेल का नाही याकडे लक्ष लागले आहे. एकूणच ही निवडणूक आता महायुती म्हणून लढविली जाते की आणखी वेगळ्या राजकीय समीकरणाच्या माध्यमातून हाही कळीचा विषय आहे. यामध्ये महाविकास आघाडीकडून कोण पुढे आणले जाईल याकडेही लक्ष आहेच. १ जून ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. २ रोजी अर्जांची छाननी होईल तर ४ जून ही अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे या निवडणुकीचे खरे चित्र हे ४ जूनला स्पष्ट होणार आहे.
सोमवारी झालेल्या प्रशिक्षण शिबिरात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांना निवडणुकीसंदर्भातील सोपविलेल्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये अधिक काटेकोरपणे पार पाडण्याच्या सूचना दिल्या. प्रशिक्षणावेळी अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजकुमार माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) हनमंत कोळेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्यासह सर्व नोडल अधिकारी व त्यांचे सहाय्यक उपस्थित होते. निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी राजकुमार माने यांनी विविध कक्ष तसेच नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाज व जबाबदाऱ्यांबाबत माहिती दिली.
जिल्ह्यात या निवडणुकीसाठी आजघडीला ४४६ मतदार आहेत. यामध्ये लोहा, नायगाव आणि अर्धापूर येथील प्रत्येकी दोन मतदार वाढीची शक्यता आहे. उमेदवारी दाखल करताना १० प्रस्तावक, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १० हजार रुपये तर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी ५ हजार रुपये अनामत शुल्क आवश्यक आहे.



