
नांदेड : नांदेड शहरात पुन्हा एकदा खुनांची मालिका सुरू झाली आहे. शुक्रवारी रात्री एका युवकाचा विमानतळ पोलिस ठाणे हद्दीत खून झाल्यानंतर रविवारी शहरात पुन्हा खुनाच्या दोन घटना घडल्या आहेत. या तिन्ही प्रकरणातील आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरीही खुनाच्या या वाढत्या घटनांमुळे पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाला की काय असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात जयभीमनगर येथील रहिवासी १७ वर्षीय तरुण सागर सुभाष केळकर आणि गंगाचाळ येथील आरोपी अविनाश उर्फ बाटल्या इंगोले व शुभम इंगोले हे दोन सख्खे भाऊ पाकिटमारी करतात. दरम्यान रविवारी रात्री रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास सागर केळकर आणि आरोपी अविनाश उर्फ बाटल्या इंगोले व शुभम इंगोले यांच्यात पैशांच्या कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी सागरवर चाकूने पोटावर, तोंडावर आणि डोक्यावर वार केल्याचे सांगण्यात येत आहे. गंभीर जखमी झालेल्या सागरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या घटनेदरम्यान पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याचा सीसीटीव्हीही पुढे आला आहे. या घटनेमुळे विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयातील खुनाच्या घटनेची आठवण झाली आहे.
दुसऱ्या घटनेत शहरातील बंदाघाट परिसरात हरियाणा रहिवासी अमित वर्मा याचा शस्त्राने वार करून खून केला आहे. १३ जुलैच्या पहाटे ही घटना घडली. महादेवसिंग सुखदेवसिंग संधू याने हा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महादेवसिंगने वैयक्तिक वादातून केलेल्या हल्ल्यात अमित वर्मा हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
नांदेड शहरात शुक्रवारी रात्री सांगवी पुलाजवळ सचिन यशवंत काळे रा. नुरी चौक याची कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या घटनेतून नांदेड सावरत असतानाच पुन्हा रविवारी रात्री खुनाच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा शहरात खूनसत्र सुरू झाले की काय असाच प्रश्न पुढे आला आहे. पोलीस मात्र या खुनाच्या घटना वैयक्तिक वादातून झाल्याने त्याचा कायदा व सुव्यवस्थेची थेट संबंध नसल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे पोलिसांसमोरच होणाऱ्या खुनाच्या घटना या गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक कमी झाल्याचेच दर्शवित आहेत. शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आता नूतन पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना कठोर उपाययोजना कराव्या लागणार आहेत.



