
नांदेड – नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत भामट्या पोलिसांनी एका वृद्धाला फसवत तब्बल दीड लाखांचा गंडा घातला असल्याची बाब पुढे आली आहे. ग्रामीण ठाणे हद्दीत अशा घटना वारंवार होत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. खऱ्या पोलिसांनी भामट्या पोलिसांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात गावांचा समावेश आहे. नांदेड शहरात येण्यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनच ये जा करावी लागते. या गाव खेड्यातून आलेल्या वृद्धांना अनेक भामटे आपण पोलीस असल्याचे सांगून काळजी घ्या, चोर फिरत आहेत. आपल्या हातातील अंगठ्या तसेच जवळ असलेली रक्कम व्यवस्थित ठेवण्याचा सल्ला देत, काहींना दरडावून भीतीही दाखवतात. लुबाडतही आहेत. अशीच ८ जुलै रोजी सकाळीच फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या गोकुळधाम सोसायटीच्या मागे राहत असलेले ५८ वर्षीय नंदकिशोर काशिराम पाटील यांना कौठा भागातील नागार्जुना शाळेच्या रस्त्यावर तीन भामट्या पोलिसांनी गाठले. चोरटे फिरत असून तुमच्या बोटातील अंगठ्या सांभाळून ठेवा, असे सांगत अंगठ्या एका कागदाच्या पुडीत बांधून ठेवा असे सांगितले. त्या तीन भामट्या पोलिसांनी पाटील यांच्या दोन सोन्याच्या खऱ्या अंगठ्या काढून घेत त्यांना नकली अंगठ्या दिल्या. १ लाख ४६ हजार रुपयांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या काढून घेऊन त्यांची फसवणूक केली.
याप्रकरणी नंदकिशोर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.



