
नांदेड – शहरातील शासकीय विश्रामगृह ते पावडेवाडी नाका या मुख्य रस्त्यावर विनापरवानगी बॅनर लावल्याप्रकरणी चेन्नई मॉलच्या व्यवस्थापकाविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी नवीन नांदेडतही कौठा भागात बॉम्बशोधक पथक कार्यालयासमोर विनापरवानगी बॅनर लावल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत नांदेड महापालिकेने १३ गुन्हे विनापरवानगी बॅनर लावल्याप्रकरणी दाखल केले आहेत.
शिवाजीनगरातील चेन्नई मॉलच्या विविध सूट योजनांचे बॅनर शहरातील काही भागात लावण्यात आले आहेत. शहरातील मुख्य रस्त्यावर शासकीय विश्रामगृह पावडेवाडी नाका येथे हे बॅनर निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणात महापालिकेचे इमारत निरीक्षक भरत शिवपुरे यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ भिसे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
त्याचवेळी नवीन नांदेडमध्ये कौठा भागात बॉम्बशोधक पथक कार्यालयासमोर ‘स्वप्न सृष्टी’ या बांधकाम व्यावसायिकानेही मुख्य रस्त्यावरच बॅनर लावले होते. हा प्रकार लक्षात येताच महापालिकेचे इमारत निरीक्षक किशन डुकरे यांनी या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ मुसळे हे करत आहेत.
शहरात कोणीही विनापरवानगी बॅनर लावू नये, बॅनर लावल्यास कठोर कारवाईचा इशारा महापालिकेचे उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी दिला आहे. बॅनर प्रकरणी असलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १३ जणांविरुद्ध महाराष्ट्र मालमत्तेचे विद्रुपीकरण अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.



