
नांदेड – नांदेड महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी एमआयएमचे मसूद अहमद खान यांची निवड करण्यात आली आहे. महापालिकेत एमआयएमचे १४ नगरसेवक आहेत. दुसरीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनेही विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यात आला होता; मात्र भारतीय जनता पक्षाच्या महापौर कविता मुळे यांनी एमआयएमचे मसूद अहमद खान यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली आहे. विरोधी पक्ष नेतेपद आणि वाद हा महापालिकेत नेहमीचाच ठरला आहे. काँग्रेस- वंचित बहुजन आघाडीने महापौरांच्या या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे
नांदेड महापालिकेत सोमवारी घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर तातडीने विरोधी पक्ष नेते पदावर एमआयएमचे मसूद अहमद खान यांची निवड जाहीर करण्यात आली. महापौर कविता संतोष मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, गटनेते ॲड. महेश कनकदंडे आणि स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले यांच्या हस्ते मसूद अहमद खान नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी भाजपा तसेच एमआयएमच्या नगरसेवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नांदेड महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे एकूण ४५ नगरसेवक निवडून आले आहेत. त्याचवेळी शिवसेना शिंदे गटाच्या पाच नगरसेवकांनीही भाजपाला पाठिंबा दिला आहे. एमआयएम १४, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १० आणि वंचित बहुजन आघाडी ०५ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा महापालिकेत समावेश आहे.
दरम्यान, या निवडीला काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने विरोध दर्शविला आहे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे एकूण १५ नगरसेवक महापालिकेत निवडून आले आहेत. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी ही निवडणुकीपूर्वी स्थापन करण्यात आली होती. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून या आघाडीला मान्यता द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांकडे एकत्रित नोंदणी असल्याने आमचाच्याच आघाडीचा विरोधी पक्षनेता व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे. याच मागणीसाठी आता वंचित आणि काँग्रेस आघाडी न्यायालयातही धाव घेण्याच्या तयारीत आहे काँग्रेसचे अब्दुल गफार हे विरोधी पक्ष नेते पदासाठी इच्छुक होते; मात्र भारतीय जनता पक्षाने एमआयएमला विरोधी पक्षनेतेपदी पसंती दिल्याने पुन्हा एकदा नांदेडकरांच्या भुवया उंचावल्या आहेत.



