
नांदेड – नांदेड जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने व्हाट्सअप स्टेटस ठेवत मरणासाठी कारणीभूत असलेल्या तत्कालीन गटशिक्षणाधिकाऱ्यांसह, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि सहशिक्षकाची नाव घेत आपल्या पोटच्या दोन मुलांसह गोदावरी नदीत कार टाकून आत्महत्या केली होती. या घटनेला आता जवळपास महिना होत असला तरीही या प्रकरणात पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केली नाही. त्यामुळे पोलीस आणि जिल्हा परिषदेने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी मयत शिक्षक सुनील मोरे यांचे वडील नारायण मोरे यांनी केली आहे. याच मागणीसाठी गेल्या तीन दिवसापासून ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाकडे प्रशासकीय यंत्रणांनी दुर्लक्षच केले आहे.
हदगावच्या तत्कालीन गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या छळास कंटाळून नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पोटा बु. येथे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असलेल्या सुनील नारायण मोरे यांनी आपल्या दोन मुलांसह १७ जुलै रोजी सकाळी आत्महत्या केल्याची गंभीर घटना घडली होती. शिक्षक असलेले सुनील नारायण मोरे १७ जुलै रोजी सकाळी नांदेडमधून निघाले. त्यांनी सारा नामक मुलगी आणि सुमित या आपल्या दोन्ही मुलांना गाडीमध्ये घेतले. ही गाडी मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथे गोदावरी नदीवर आली असताना त्यांनी आपली कार सरळ नदीमध्ये टाकली. यात तिघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये पहिला गुन्हा हदगावचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी किशन फोले, विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे, केंद्रप्रमुख शिवाजी कदम आणि सुनील मोरे यांचे सहकारी दत्ता विश्वंभर पवळे या चौघाविरुद्ध ॲट्रॉसिटी कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी सुनील मोरे यांच्या दोन मुलांच्या शवविच्छेदन अहवालानतर त्यांचा खून केल्याचा गुन्हा मयत सुनील मोरेविरुद्ध दाखल केला आहे. या प्रकरणातील ॲट्रॉसिटी गुन्ह्याचा तपास इतवारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे; तर दुसऱ्या गुन्ह्याचा
तपास हा नांदेड ग्रामीण पोलीस करत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या १७ जुलै रोजी घडलेल्या या प्रकरणात अद्याप नांदेड ग्रामीण पोलिसांकडून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. व्हाट्सअप स्टेटसवर नाव लिहिलेल्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असला तरीही ते अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. या चार अधिकाऱ्याविरुद्ध सुनील मोरे यांनी नांदेड जिल्हा परिषदेकडेही मोठ्या प्रमाणात पत्र व्यवहार केला होता. जवळपास एक वर्षापासून तक्रारी केल्या जात होत्या; मात्र या प्रकरणाची संचिका शिक्षण विभागात धूळखातच पडली होती. अखेर वैतागलेल्या सुनील मोरे यांनी टोकाचे पाऊल उचलत थेट आत्महत्येसारखा गंभीर प्रकार निवडला. त्यात आपल्या दोन मुलांचा बळीही घेतला. यात शवविच्छेदन अहवालानंतर मुलांचा खून झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरीही आता मयत सुनील मोरे यांचे वडील नारायण मोरे यांनी मात्र गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी कोणतही पंचनामा न करता सर्व प्रेत ही थेट रुग्णालयात नेली आणि तिथे पुढे काय झाले हे आम्हाला माहिती नाही, सुनील मोरे हा आपल्या मुलांना मारू शकत नाही असा दावाही नारायण मोरे यांनी केला आहे. मुलांच्या अंगावर चाकूने हल्ला केल्याच्या कोणत्याही खुणा नसल्याचेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे. एकूणच या प्रकरणात आता वेगवेगळे दावे केले जात आहेत.
सुनील मोरे यांचे वडील नारायण मोरे, त्यांचे कुटुंबीय तसेच इतर गावकरी हे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापुढे तीन दिवसापासून उपोषण, धरणे आंदोलन करत आहेत; मात्र त्याकडे दुर्लक्षच झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलीस प्रशासन, नांदेड जिल्हा परिषद तसेच जिल्हा प्रशासनही संवेदनाहीन झाले काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. मयत सुनील मोरे प्रकरणात पोलिसांकडून फौजदारी कारवाईला विलंब होत आहे त्याच वेळी नांदेड जिल्हा परिषदेकडूनही कोणतीही प्रशासकीय कारवाई अद्याप त्या चार अधिकाऱ्याविरुद्ध केली नाही. साधी नोटीसही या प्रकरणात दिली नसल्याची माहिती खुद्द जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. त्याचवेळी या प्रकरणामध्ये नांदेड जिल्ह्यातील दोन स्थानिक आमदारांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोपही मयत सुनील मोरे यांचे वडील नारायण मोरे यांनी केला आहे.



