
नांदेड – नांदेडमध्ये तीन दिवसांच्या खाजगी दौऱ्यावर असलेले पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि अकाली दलाचे प्रमुख नेते स. सुखबीरसिंघ बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात मुगट येथे माता साहेब गुरुद्वारात घडली. या प्रकरणात एका हल्लेखोरास पोलिसांनी तात्काळ अटक केली असून सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या एसपीयुचे पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे हा जीवघणा हल्ला परतवून लावण्यात यश आले. या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंघ यांच्या प्रकृतीची चौकशी करत सुरक्षा यंत्रणांना अधिक सूचना दिल्या आहेत. सुखबीर सिंघ यांना झेड प्लस सुरक्षा असतानाही झालेल्या या हल्ल्यानंतर आता सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ नांदेड येथे संपर्क साधला. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंघ यांच्या प्रकृतीची त्यांनी चौकशी केली. त्याचवेळी संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही फोनद्वारे या घटनेची माहिती घेतली. या घटनेचा सर्वच अँगलने तपास केला जात असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी सांगितले. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंघ बादल हे बुधवारपासून नांदेडमध्ये आहेत. त्यांनी नांदेड येथे श्री सचखंड गुरुद्वारामध्ये दर्शन घेतल्यानंतर आज गुरुवारी प्रारंभी माळटेकडी साहिब, हिराघाट साहिब येथे दर्शन घेतले. त्यानंतर मुघट येथील माता साहब गुरुद्वारा येथे ते पोहोचले. तेथे गुरुद्वारात दर्शन घेऊन परत येत असतानाच ६० ते ६२ वर्षीय जसपालसिंघ या निहंगसिंघाने त्यांच्यावर कृपाणने हल्ला केला. हे पाहताच स्पेशल प्रोटेक्शन युनिटचे पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी क्षणाचाही विलंब न लावता ते कृपाण हातात पकडले आणि हल्लेखोराला जेरबंद केले. या हल्ल्यात माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंघ बादल यांच्या हाताला जबर दुखापत झाली. घटनेचे गांभीर्य ओळखताच त्यांना तातडीने उपचारासाठी नांदेड येथील यशोसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती आता संपूर्णतः धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन आणि इतर अधिकारी तातडीने रुग्णालयात पोहोचले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. रोहन यांनी घटनास्थळीही भेट दिली.
नांदेड येथील या घटनेचा श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे मुख्य प्रशासक डॉ. विजयसिंह सतबीर, माजी सचिव रवींद्रसिंघ बुंगई यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. नांदेडमध्ये गुरु महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवरील हा हल्ला अतिशय निंदनीय असल्याचे रवींद्रसिंघ बुंगई म्हणाले. तर गुरुद्वारा बोर्डाचे मुख्य प्रशासक डॉ विजयसिंघ सतबीर यांनी या माता साहिब गुरुद्वाराचे कोणतेही नियंत्रण आमच्याकडे नसल्याचे सांगितले. आम्ही श्री सचखंड गुरुद्वारा येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाची काळजी घेतो. यामध्ये पोलिसांची मदत असते असेही त्यांनी सांगितले.
हल्लेखोर म्हणाला…आय ॲम सरेंडर, आय एम सरेंडर..! मूळचा पुणे येथील असलेला आरोपी जसपाल सिंघ हा गेल्या दोन वर्षापासून नांदेडमध्ये सेवादार म्हणून मातासाब गुरुद्वारा येथे होता. नेहमीप्रमाणे आजही तो गुरुद्वारा माता साहब येथे सेवेला होता. माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंघ हे दर्शन घेऊन परत येत असताना दर्शन घेण्याच्या अवस्थेत त्याने हातात कृपाण पकडलेले होते. याच कृपणाने त्याने थेट माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंघ बादल यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला त्याने थेट छातीवर करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र एसपीयुतील पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी हा हल्ला तातडीने परतवून लावत ते कृपाण हाताने पकडले. तेही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांच्यावरही यशोसाई रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर तात्काळ पकडलेल्या हल्लेखोर जसपालसिंघ याने तातडीने तेथेच आय एम सरेंडर… आय एम सरेंडर.. असे म्हणून स्वतःला तेथे पोलिसांच्या स्वाधीन केले. पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तर त्याच्या जीवावरही बेतले असते. हे त्याने जाणले आणि त्याने हल्ल्यानंतर लगेचच आय एम सरेंडर… आय एम सरेंडर च्या घोषणा देत स्वतःला पोलिसांच्या हवाली केले. विशेष म्हणजे सुखबीरसिंघ बादल यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी आधीच वर्तवली होती. असे असतानाही मुगट येथे झालेला हा हल्ला सुरक्षा यंत्रणांचे अपयशच मानले जात आहे; मात्र पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी आरोप फेटाळून लावत पोलिसांच्या सतर्कतेनेच हल्लेखोराला तातडीने पकडले असल्याचे सांगितले.



