
नांदेड – नांदेड जिल्ह्यातील घडलेल्या दोन अमानवीय घटनांमध्ये जिल्ह्यातील शाळांमध्ये मुलींची सुरक्षितता धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. नांदेड शहरातील कैलासनगर, देगलूरमधील अंध विद्यालयातील घटना संवेदनशील मनाला हादरवून सोडणाऱ्या आहेत. अशा गंभीर प्रकरणानंतरही समाजधुरीण म्हणून जे ठिकठिकाणी मिरवतात त्यांनीही अशा प्रकरणांमध्ये मूग गिळले असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे दोन्हीही प्रकरणांमधील पिडित या मागासवर्गीय असल्याने या विषयाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. प्रशासकीय यंत्रणांची मात्र या प्रकरणांमध्ये एक प्रकारे अनास्थाच दिसून येत आहे.
नांदेडच्या सीमेवरील हिंगोली, लातूर या जिल्ह्यात शाळांच्या दूरवस्थेविषयी कॉक्रोच पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे भेटी देऊन शाळांची दुरवस्था उघडकीस आणत आहेत. हे प्रश्न भौतिक सुविधांबाबत असले तरीही नांदेड जिल्ह्यात मात्र मुलींच्या सुरक्षिततेवर सामाजिक आघात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नांदेड शहरातील कैलासनगर भागात असलेल्या प्रतिभा निकेतन हायस्कूल या शाळेत पाचवीमध्ये शिकणाऱ्या मुलींना लेझीम शिकण्यासाठी वर्ग रिकामा आहे का हे पाहूया असे म्हणून शाळेत लवकर आलेल्या एका मुलीला एका वर्गात नेले. चिमुकलीवर वर्गातच विनयभंग केला. या घटनेनंतर पिडित मुलीस ही घटना कोणाला सांगितले तर तुला शाळेतून काढून टाकतो अशी धमकीही त्याने दिली. या सर्व घटनेनंतर घाबरून गेलेल्या मुलीने झालेला सर्व प्रकार घरी गेल्यानंतर आईला सांगितला. आईने या प्रकरणात थेट भाग्यनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आईच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शाळेचा मुख्याध्यापक रवी सोनवणे याला अटक केली आहे. या प्रकरणात पिडित मुलगी ही मागासवर्गीय आहे. मुख्याध्यापक सोनवणेविरुद्ध पोक्सोसह अनुसूचित जाती जमाती अन्याय प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या एका घटनेत देगलूर येथे निवासी अंध शाळेतील दहावीत शिकणारी एक विद्यार्थीनी आजारी पडल्याने तिला प्रारंभी देगलूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे उपचारानंतरही प्रकृतीस सुधारणा झाली नाही. उलट प्रकृती बिघडल्याने लातूर येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र तिथे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात निवासी अंध विद्यालय देगलूर येथे वसतीगृहात शिक्षणासाठी असलेल्या अंध मुलीवर वसतीगृहातील चंद्रशेखर कोकाटे हा तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करत होता. अशावेळी तिची देखभाल आणि काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक मारुती शिंदे, कर्मचारी अशोक काळे, कमलबाई रामचंद्र कांबळे आणि इतर कर्मचारी यांनी बालिकेस वेळीच उपचारकामी रुग्णालयात दाखल केले नाही, आजाराची पूर्वकल्पना नातेवाईकांना दिली नाही या सर्व प्रकरणात हयगय आणि निष्काळजीपणा केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अंध मुलगी ही उपचारादरम्यान मरण पावली. या प्रकरणात देगलूर ठाण्यात विविध कलमान्वये पोक्सो तसेच ॲट्रॉसिटीनुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांना या निवासी शाळेचा संस्थापक कोण आहे हे अद्यापही समजले नसल्याची बाबही पुढे आली आहे. या प्रकरणात आता भाजपाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांनी देगलूर ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. दिव्यांग संघटनाही या प्रकरणात आता मैदानात उतरली आहे.
देगलूर येथील सुगत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अंध विद्यालयातील विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण अत्यंत गंभीर व संवेदनशील आहे. या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. सदर मुलीवर घटनेनंतर प्रथम उपचार करणारे डॉ. मुंडे यांचीही या प्रकरणाच्या अनुषंगाने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. मुलीला उपचारासाठी आणण्यात आल्यानंतर तिची प्रकृती, तिला झालेल्या दुखापती, उपचाराची स्थिती तसेच डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय नोंदी याबाबत महत्त्वाची माहिती त्यांच्या कडून मिळू शकते. या प्रकरणातील इतर व्यक्तींवर कारवाई किंवा चौकशी होत असताना प्रथम उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा जबाब, वैद्यकीय नोंदी आणि त्यांच्या भूमिकेची चौकशी करण्यात आली आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला पूर्वग्रहाने वगळू नये किंवा विनाकारण आरोपी करू नये; उपलब्ध पुरावे, वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल रेकॉर्ड, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि इतर सर्व बाबींच्या आधारे तपास करण्यात यावा. या प्रकरणात सत्य समोर यावे आणि पीडित मुलीला न्याय मिळावा, यासाठी तपास यंत्रणेने कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी करावी, उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल रेकॉर्ड व इतर इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची तपासणी करावी. संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणीही भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा पातळीवरील नेत्यांनी केली आहे.
जुलै २०२६ मध्ये नांदेडमधील रहिवासी असलेल्या सुनील मोरे नामक मागासवर्गीय शिक्षकाने आपल्या दोन मुलांसह नांदेडनजीक पुणेगाव येथे आपली कार गोदावरी नदीत टाकली. यात शिक्षकासह दोन मुलांचा करुण अंत झाला. १७ जुलै रोजी घडलेल्या या प्रकरणात ना नांदेड पोलिसांनी कारवाई केली ना नांदेड जिल्हा परिषदेने या प्रकरणात कारवाई केली. त्यामुळे मरणाची वाट पत्करण्यापूर्वी ज्या चौघांची नावे सुनील मोरे यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर ठेवली होती ते चौघेही आज उजळ माथ्याने समाजात उजळ माथ्याने मिरवत आहेत. दुसरीकडे मोरे परिवार मात्र रस्त्यावर आला आहे. सुनील मोरे यांच्या वडिलांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण केले; मात्र यामध्ये कोणतीही कारवाई झाली नाही. मोरे प्रकरणातील कारवाई संदर्भात नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्याशी चर्चा केली असता या प्रकरणात पोलीसच आता कारवाई करू शकतील असे त्यांनी स्पष्ट केले तर दुसरीकडे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी अजूनही या प्रकरणाचा तपास सुरूच असल्याचे सांगितले आहे. अद्याप कोणतेही पुरावे हाती आले नसल्याने कुणालाही अटक झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी काळात तरी या प्रकरणात कोणाला अटक होईल का असे विचारले असता पुरावा मिळाला तर पाहू असे डॉ. निलाभ रोहन म्हणाले. त्यामुळे या मोरे परिवाराला न्याय मिळेल अशी शक्यता कमीच दिसत आहे. एकूणच जिल्ह्यात मागासवर्गीयांच्या हाल अपेष्टा दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे. याविरोधात आता रस्त्यावरील लढाई गरजेची आहे. ही लढाई लढणारा कोणी नेता उरला की नाही असाच प्रश्न पीडितांच्या नातेवाईकांकडून उपस्थित होत आहे.



