प्रशासकीय

लोहा तहसील कार्यालयातील शिवीगाळ प्रकरणात नायब तहसीलदारासह सहाय्यक महसूल अधिकाऱ्याविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव 

कार्यालयामध्ये आलेल्या कार्यकर्त्याच्या कॉलरला धरून बाहेर काढण्याचा प्रयत्न..! मी पण इथलाच काय करायचे ते कर म्हणून धमकावण्याचीही भाषा वापरली, सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल, सामान्य नागरिकांमध्ये अधिकाऱ्याविरुद्ध संताप

नांदेड – लोहा तालुक्यातील एका फेरफार प्रकरणाच्या विषयात नायब तहसीलदार राजेश पाठक आणि सहाय्यक महसूल अधिकारी अजित केला यांनी एका कार्यकर्त्याची कॉलर धरून त्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या प्रकरणात आता या दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचा अहवाल नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. त्याचवेळी शेतकऱ्याने लोहा पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे. या सर्व प्रकारात लोहा तहसीलमधील सर्व कर्मचाऱ्यांनीही त्या कार्यकर्त्याविरुद्ध तक्रार दिली असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे हे शासकीय कामात अडथळे आणल्याचे आणि अन्य दोन गुन्हेही दाखल असल्याची माहितीही पुढे आली आहे. त्यामुळे एकूणच या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले असून सोशल मीडियावरील व्हिडिओनंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले या प्रकरणात नेमकी काय कारवाई करतील याकडे लक्ष लागले आहे.

लोहा येथील गट क्रमांक ९६ मधील फेरफाराचे हे प्रकरण मंडळ अधिकारी लोहा यांनी ७ जुलै २०२६ रोजी निकाली काढले होते. याच प्रकरणात लोहा तालुक्यातील रिसनगाव येथील बालाजी अर्जुन शिंदे आणि इतर दोघेजण १७ ऑगस्ट रोजी लोहा तहसील कार्यालयात दुपारी बारा वाजेच्या सुमारास दाखल झाले. त्यांनी तेथे असलेल्या सहाय्यक महसूल अधिकारी अजित केदार यांच्याशी सदर फेरफार का मंजूर केला याबाबत विचारणा केली. त्यावेळी आवश्यक ती कागदपत्र केदार यांनी दाखवले. या प्रकरणात शिंदे आणि अन्य दोघांनी केदार यांच्याशी शाब्दिक वाद घातला.त्यातून नायब तहसीलदार राजेश पाठक यांनाही त्यांनी वादात ओढले. शिंदे यांनी सांगितल्यानुसार शिंदे हे गजानन नळगे यांच्या कामासंदर्भात तहसील कार्यालयात आले होते. सदर प्रकरणात निकाल विरुद्ध गेल्याने त्यांनी अपील करावे असे वारंवार त्यांना सांगितले जात होते. विशेष म्हणजे बालाजी शिंदे यांचा त्या फेरफार प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे तहसील अधिकारी, कर्मचारी सांगत आहेत.

या सर्व वादाचा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. शिंदे यांच्या कॉलरला धरून नायब तहसीलदार राजेश पाठक हे त्यांना बाहेर जाण्यास सांगत आहेत. इतकेच नव्हे तर ‘तुला काय करायचे ते कर, मी पण इथलाच आहे’ अशी दमदाटीची भाषाही हे दोन्ही अधिकारी कर्मचारी वापरत असल्याचेही निदर्शनास आले आहे. या सर्व प्रकरणात नायब तहसीलदार राजेश पाठक आणि महसूल सहायक महसूल अधिकारी अजित केदार यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रथमदर्शनी बालाजी शिंदे यांनी कर्मचारी अधिकाऱ्यांशी वाद न घालता कायदेशीर मार्गाने आपली बाजू मांडणे अपेक्षित होते असे स्पष्ट करण्यात आले आहे. लोहा तहसील कार्यालयाकडून आपली बाजू मांडताना लोहा येथे सर्व शेतकरी बांधव आणि सर्वसामान्यांची कामे पात्र आणि नियमानुसार प्राधान्याने केली जात असल्याचे सांगितलेले आहे. त्याचवेळी सर्व नागरिकांशी सौजन्याने वागले जाते असेही नमूद केले आहे. प्रत्यक्षात समाज माध्यमावरील व्हिडिओ पाहिले असता तहसीलने दिलेल्या खुलाशाच्या अगदी विरुद्ध चित्र दिसून येते. फेरफार प्रकरणात निर्णय झालेला असतानाही बालाजी शिंदे यांनी महसूल अधिकारी केदार आणि नायब तहसीलदार पाठक यांच्याशी तासभर शासकीय कार्यालयात गोंधळ घातला. ही व्यक्ती गुन्हेगारी पार्श्वभूमीची असल्याचे दिसून येत असल्याचेही महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. त्याच्याविरुद्ध लोहा गटविकास अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांनी लोहा पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. इतर फौजदारी प्रकरणातही त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सदर व्यक्तीच्या वर्तनाची तसेच पूर्व इतिहास तपासण्याची मागणीही करण्यात आली आहे. त्याचवेळी लोहा तहसीलचे नायब तहसीलदार राजेश पाठक आणि सहाय्यक महसूल अधिकारी अजित केदार यांनीदेखील या प्रकरणात वाद घालणे अपेक्षित नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी असा प्रस्ताव नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

दोन्ही बाजूने लोहा पोलीस ठाण्यात तक्रारी..! या प्रकरणात लोहा तहसील कार्यालयातील कर्मचारी यांनी तहसीलदारामार्फत बालाजी शिंदेविरुद्ध कारवाईची मागणी करणारे पत्र लोहा पोलिस ठाण्यात दिले आहे. सातत्याने अशा दमदाटी करणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध कारवाई करावी, असे पत्रात नमूद केले आहे; तर दुसरीकडे बालाजी शिंदे यांनीही लोहा ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सातबारावरील जमीन कमी झाल्याबाबत विचारणा करण्यास गेलो असता सहाय्यक महसूल अधिकारी अजित केदार आणि नायब तहसीलदार राजेश पाठक यांनी कॉलरला धरून बाहेर काढून धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे. मी इथलाच आहे, तुझ्याने काय करायचे ते कर’ अशा प्रकारे धमकी दिली तसेच शर्टाला धरून आम्हाला कार्यालयाच्याबाहेर काढले. शासकीय कार्यालयात आमच्या सोबत अशा प्रकारे वर्तन करून आम्हाला धमकावणे व अपमानित करणे हा प्रकार गंभीर असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. या घटनेच्या वेळी तहसील कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्यास त्यामध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड झाली आहे. त्यामुळे १७ ऑगस्ट २०२६ च्या दुपारी १२ वाजताच्या सीसीटीव्ही फुटेज तात्काळ सुरक्षित ठेवून तपासण्यात यावे तसेच घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे तसेच प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदवावेत अशी मागणीही शिंदे यांनी लोहा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केली आहे. आता लोहा पोलिसांकडून या दोन्ही तक्रारीवर नेमकी काय कारवाई केली जाईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!