
नांदेड – भारतीय जनता पक्षाचे नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा नांदेडमध्ये उभारण्यात येणार आहे. जवळपास पंधरा फूट उंचीच्या या पुतळा निर्मितीसाठी ४१ लाखांची निविदा स्थायी समितीच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आल्याची माहिती स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी दिली. पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीपूर्वी म्हणजेच २५ डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नांदेड महापालिकेच्या स्थायी समितीची सभा १८ ऑगस्ट रोजी सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेमध्ये नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा ब्राँझ धातूमधील पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी प्राप्त झालेल्या निविदांना मान्यता देण्यात आले. या कामासाठी दुसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पाच निविदाधारक सहभागी झाले होते. त्यापैकी तीन दर पत्रधारक पात्र ठरले आहेत. त्यामध्ये दिल्ली येथील राम सुतार आर्टने १५ फूट उंचीच्या पुतळ्यासाठी ७५ लाख रुपये, अमरावतीच्या गणिती कला केंद्राने ५७ लाखांची निविदा भरली होती. तर सर्वात कमी दराची निविदा पुण्याच्या मे. ऋषी आर्टने दाखल केली. १५ फूट उंचीच्या पुतळ्यासाठी ४१ लाख ३० हजार रुपयांची निविदा भरली होती. या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. सर्वात कमी दर असल्याने ही मंजुरी देण्यात आल्याचे सभापती गाडीवाले यांनी स्पष्ट केले. नांदेड शहरात लवकरच हा ब्रांझ धातूचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्यासाठी शहरात जागा निश्चितीचे काम केले जात आहे. पुतळ्याला ४१ लाख ३० हजार रुपये खर्च येणार आहे. त्याचवेळी परिसर सुशोभीकरणासाठी वेगळी निविदा काढली जाणार आहे. ती निविदाही लवकरच काढून कामाला प्रारंभ केला जाईल, असे सभापती गाडीवाले यांनी सांगितले.
नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपल्या संकल्पनाम्यात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्याचे वचन दिले होते. ते वचन या कामाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. भाजपा नेते, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेत वेगवेगळे विकासकामे केली जात आहेत. शहरात मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जात जात आहे त्याचवेळी आवश्यक विकास कामेही वेगाने पूर्ण होत असल्याचे सभापती गाडीवाले यांनी स्पष्ट केले.



