
नांदेड – चारचाकी वाहनाच्या थकीत हप्त्याची रक्कम तात्काळ भरण्याचा सतत तगादा लावल्यामुळे सिडको येथील संभाजी चौक येथे राहणाऱ्या प्रबुद्ध अशोक मगरे या २८ वर्षीय युवकाने बुधवारी २६ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
प्रबुद्ध मगरे याने सन २०२३ मध्ये पुणे येथील श्रीराम फायनान्स कंपनीच्या भूमकर चौक, वाकड शाखेतून कर्ज घेऊन एक चारचाकी वाहन खरेदी केले होते. सुरुवातीच्या काळात त्याने जवळपास दोन वर्षे कंपनीचे नियमित हप्तेही भरले. २०२५ मध्ये मुंबई-पुणे मार्गावर त्याच्या गाडीला अपघात झाला होता. यात तो बचावला, पण गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अपघातास कारणीभूत असलेल्या वाहनधारकाविरुद्ध पोलिसात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गाडीचे इन्शुरन्स क्लेम केल्याने २०२६ मध्ये ही गाडी दुरुस्त करण्यात आली. यासाठी जवळपास ९ महिन्याचा कालावधी लागल्याने गाडी पुणे येथे गॅरेजमध्येच होती. त्यामुळे उत्पन्न शून्य झाले होते. तरी देखील नियमित हप्ते भरून, थकीत हप्त्यांची रक्कम भरणा करण्यासाठी काही दिवसांचा अवधी देण्याची विनंती, प्रबुद्धने बाणेर, पुणे येथील श्रीराम फायनान्स कंपनीच्या शाखाधिकाऱ्यांना केली होती. तडजोडीअंती किमान 2 लाख रुपये भरावेच लागतील. अन्यथा वाहन रस्त्यावर गाठून ओढून नेण्यात येईल, अशी धमकी कंपनीने दिली. इतकेच नव्हे तर, गेल्या आठवडाभरापासून सतत मोबाईल कॉल करून पैसे भरण्यासाठी तगादा लावला जात होता. बुधवारी २६ ऑगस्ट रोजीही सायंकाळी श्रीराम फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीने प्रबुद्धला मोबाईल कॉल केला. यावेळी त्याने प्रतिनिधीला गुरुवारी २७ रोजी पुण्यात येऊन कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटून व पैसे भरून गाडी फ्री करणार असल्याचे सांगितले. तरीही प्रतिनिधीने ऐकले नाही. त्यामुळे प्रबुद्धने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी व्हिडिओ करून वडिलांना दिली माहिती..!आत्महत्या करण्यापूर्वी त्याने श्रीराम फायनान्स कंपनी, पुणे येथील शाखेच्या तगाद्यामुळे त्रस्त झाल्याचे सांगत स्वतःचा व्हिडिओ तयार करून वडिलांना व्हॉट्सॲपवर पाठवला. शिवाय काही सेकंद तो फेसबुकवर लाईव्हदेखील होता. प्रबुद्ध अशोक मगरे याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा व भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे. वंचित बहुजन आघाडीचे नांदेड दक्षिण जिल्हा कोषाध्यक्ष अशोक मगरे यांचा तो मुलगा होता. या आत्महत्या प्रकरणात श्रीराम फायनान्स पुणे येथील कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मयत प्रबुद्ध मगरे याच्या नातेवाईकांनी केली आहे.



