
नांदेड – ऑटो चोरीतील संशयित आरोपीला पकडून नेत असताना रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास किनवट येथे संशयित आरोपीच्या नातेवाईकांनी तेलंगणा पोलिसावर हल्ला करून शेख जाफर उर्फ बाखर शेख आदम या संशयिताला हातकडीसह पळवून नेले. तेलंगणा पोलिसाची गाडीही फोडली. यावेळी तेलंगणा पोलिसांनी बचावासाठी गोळीबारही केला. घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र आणि तेलंगणा पोलिसांनी संयुक्तपणे शोध मोहीम राबवून संशयित आरोपी शेख जाफर उर्फ बाखर शेख याला एका शेतातून अटक केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली होती.
किनवट तालुक्यातील चिखली बु. येथील शेख जाफर उर्फ बाखर शेख आदम (वय ४५) या ऑटो चालकास ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा ते सात वाजेदरम्यान तेलंगणा पोलिसांनी किनवट येथून ऑटो चोरीच्या प्रकरणात त्याला अटक केली होती. त्याला एका खाजगी वाहनाने ताब्यात घेऊन ते परत जात असताना किनवट येथील गोकुळनगरमध्ये आरोपीताच्या नातेवाईकांनी पोलिसांवर थेट हल्ला चढवला. यामध्ये काही महिलांचाही समावेश होता. अचानक झालेल्या या हल्ल्याने तेलंगणा पोलीस हादरले. हल्लेखोरांनी पोलिसांचे वाहन फोडले. त्यावेळी तेलंगणा पोलिसांनी बचावासाठी पोलिसांनी थेट गोळीबार केला. या सर्व घडामोडी पोलिसांनी पकडलेला शेख जाफर उर्फ बाखर शेख आदम हातकडीसह पळून गेला.
घटनेची माहिती मिळताच किनवटचे पोलीस निरीक्षक गणेश कराड, इस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधवर आणि इतर अधिकारी मोठ्या फौजफाट्यासह चिखली येथे पोहोचले. तेलंगणा पोलिसांना हवा असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेत असताना तो एका शेतात लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला जेरबंद करून तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
या घटनेनंतर पुन्हा एकदा किनवट तालुक्यातील चिखली गाव चर्चेत आले आहे. चिखलीतील अनेकजण सागवान तस्करी करतात. पोलिसांवर अनेक हल्ले येथील गावकऱ्यांनी केल्याचे दाखले आहेत. त्यात चिखली येथे कारवाई म्हणजे पोलिसांची एक मोठी मोहीमच असते. संपूर्ण फौजफाट्यासह येथे कारवाई करावी लागते. किनवट तालुक्यातील चिखली हे कुख्यात गाव आहे. रविवारी तेलंगणा पोलीस प्रारंभी किनवट ठाण्यात आले. किनवट ठाण्यातील एक पोलीस सोबत घेतला होता. किनवटमधून ‘आपला माणूस’ उचलला ही बातमी चिखलीत पोहोचली. त्यामुळे गावातील लोक जमा झाले आणि चिखली फाट्यावर येऊन थांबले. तेलंगणाकडे जाण्यासाठी हाच एकमेव रस्ता होता. तेलंगणा पोलीस याच रस्त्यावरून जाणार ही माहिती गावकऱ्यांना होती. त्यामुळे गावकरी तेथे जमा झाले. शेख जाफरला घेऊन आलेली गाडी चिखली फाट्यावर येताच गावकऱ्यांनी तेलंगणा पोलिसांच्या गाडीवर थेट हल्ला केला. आरोपी चिखलीचा आहे हे किनवट पोलिसांना माहिती होते. त्यामुळे त्याला नेताना आवश्यक ती खबरदारी स्थानिक पोलिसांनीच घेणे आवश्यक होते; मात्र ती घेतली नाही, असेही या घटनेवरून स्पष्ट होते. आरोपी नेत असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली कशी? त्यानंतर झालेला हल्ला हा किनवटचा बिहार होत असल्याचे दर्शवित आहे.
किनवटमध्ये पिवळ्या ऑटोवर वरदहस्त कोणाचा..?
किनवट शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिवळे ऑटो चालतात. जवळपास ३५० ते ४०० ऑटो या भागात सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी एक ऑटो आणि दुचाकीचा अपघात झाला होता. तो ऑटोही पिवळाच होता. तेलंगणा पोलीस ज्या प्रकरणात आले होते तो चोरीचा ऑटोही पिवळाच होता. चिखलीतील ९० टक्के ऑटो, मोटरसायकल हे चोरीचे असल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये बहुतांश ऑटो तसेच दुचाकींना क्रमांक नसतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ऑटो आणि दुचाकीचा गुन्हेगारीसाठी वापर होत असतो. हे ऑटोचालकांकडून पोलिसांसह वनविभागावरही मोठ्या प्रमाणात दादागिरी केली जाते. किनवटचे नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम यांनी या ऑटोविरुद्ध मोहीम हाती घेतली होती; मात्र ती मोहीम त्यांना स्थानिक दबावामुळे मागे घ्यावी लागली. त्यात स्थानिक किनवट पोलीसही या पिवळ्या ऑटोकडे दुर्लक्ष करत असतात. यामागेही मोठे आर्थिक गणित असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे पिवळे ऑटो बंद झाल्यास आर्थिक गणित कोलमडण्याची भीतीही व्यक्त होत आहे.



