अपघात

किनवट तालुक्यात ऑटो, दुचाकीची धडक, अपघातात महिला जागीच ठार, दोघे जखमी

जखमींची प्रकृती चिंताजनक, गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

नांदेड : किनवट तालुक्यातील चिखली फाटा ते सोनाळा रस्त्यावर शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ऑटो आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक ६० वर्षीय महिला जागीच ठार झाली तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रक्षाबंधन सणानिमित्त कौटुंबिक कार्यक्रम आटोपून चिखली फाटा ते सोनाळा दरम्यान काही जण प्रवास करत असताना हा दुर्दैवी अपघात घडला. सोनाळाकडून चिखलीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीची किनवटकडून येणाऱ्या ऑटो रिक्षासोबत जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की नरपतबाई बद्दूसिंग कटकवाल (वय ६०, रा. हिमायत गुंठा, तेलंगणा) या महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातातील गंभीर जखमींना तातडीने गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या तपासानंतर अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!