क्राईम

नांदेडमध्ये आणखी एका शिक्षकाची आत्महत्या..!

समायोजनाच्या कारणावरून संस्थाचालकासह जिल्हा परिषदेने केली होती टोलवाटोलवी, अद्याप गुन्हा दाखल नाही, संस्था कुणाची याबाबत पोलीस अनभिज्ञ, तपास सुरू 

नांदेड – नांदेड शहरातील एका शिक्षकाने मृत्यूला कवटाळले आहे. खाजगी संस्थेतील विद्यार्थी संख्या कमी झाल्याने अतिरिक्त ठरलेल्या या शिक्षकाचे समायोजन अन्य ठिकाणी करण्यात आले होते. इतर ठिकाणी न पाठवता याच शाळेत आपल्याला राहू द्यावे, अशी विनंती त्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे केली होती. मात्र संस्था चालकाने जागाच नाही तर ठेवायचे कसे असे म्हणून रुजू करून घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे नैराश्यात आलेल्या या ४२ वर्षीय शिक्षकाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. या आत्महत्यानंतर पुन्हा एकदा शिक्षण विभाग चर्चेत आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडमधील वामननगर परिसरात असलेल्या ‘ब्ल्यू बेल्स’ च्या इमारतीमध्ये चालत असलेल्या रवींद्र प्रार्थमिक शाळेत कार्यरत असलेले राजकुमार नागोराव धोंगडे हे शिक्षक गेल्या काही दिवसापासून समायोजनाच्या प्रश्नामुळे वैफल्यग्रस्त झाले होते. त्याच्या खाजगी शाळेतील विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे त्यांना अतिरिक्त ठरवण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेने त्यांचे समायोजन इतर शाळेत केले होते; मात्र ते इतर ठिकाणी जाण्यास इच्छुक नव्हते. त्यांनी नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे विनंती अर्ज करून आपल्याला पुन्हा रविंद्र प्रार्थमिक शाळेत ठेवावे, अशी विनंती केली होती. या विनंती अर्जावरून त्यांचे समायोजन नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुन्हा एकदा रवींद्र प्रार्थमिक शाळेत केले; मात्र संस्थाचालकाने येथे जागाच नाही तर आम्ही पगार कशी करायची, त्यांना ठेवायचे कसे असे अनेक प्रश्न उपस्थित करून रुजू करून घेण्याबाबत नापसंती दर्शवली होती. याच कारणावरून शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षक राजकुमार धोंगडे यांच्यामध्ये खटके उडाले होते. या सर्व प्रकारामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या राजकुमार यांनी रविवारी विषारी द्रव्य प्राशन करून आपले जीवन संपविले. धोंगडे यांच्या आत्महत्येच्या नेमक्या कारणाचा तपास भाग्यनगर पोलीस करत आहेत. शवविच्छेदनानंतर धोंगडे यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नायगाव तालुक्यात नेले आहे. तक्रारीसाठी अद्याप कोणीही पोलीस ठाण्यात न आल्याने या संदर्भाने कोणताही गुन्हा अद्याप दाखल झाला नसल्याची माहिती भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी दिली.

नांदेडजवळील पुणेगाव येथे गोदावरी नदीत कार टाकून एका शिक्षकाने आपल्या दोन मुलासह १७ जुलै रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास अद्याप शून्य असताना नांदेडमध्ये आणखी एका शिक्षकाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली आहे. या दोन्ही शिक्षकांनी नांदेड जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केला होता; मात्र त्यात तोडगा निघाला नाही आणि या दोन्ही शिक्षकांना आत्महत्येचा मार्ग निवडावा लागला आहे. त्यामुळे नांदेड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. दुसरीकडे नांदेड शहरासह देगलूरमध्ये विद्यार्थ्यांनीवर अत्याचार केल्याचा आरोप होत आहे. नांदेडमधील प्रकरणात मुख्याध्यापकाला अटक केली आहे तर देगलूरमध्ये अजूनही तपासाबाबत विविध सामाजिक संघटना साशंकता व्यक्त करीत आहेत. नांदेड जिल्ह्यातील या वाढत्या घटना शैक्षणिक सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!