
नांदेड – दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेस काल गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. हजारो भाविकांनी काल पहिल्या दिवशी यात्रेत दर्शन घेतले. ही यात्रा हौशी यात्रेकरूंसाठीही प्रसिद्ध आहे. लोककला, महोत्सव, लावणी महोत्सव यासह बॉम्बे डान्सही या ठिकाणी होत असतात. यंदा अनेक बॉम्बे डान्सचे संच माळेगावात दाखल झाले असले तरी अद्याप पोलिसांकडून या बॉम्बे डान्सला परवानगी मिळाली नसल्याची बाब पुढे आली आहे. एक-दोन दिवसात ही परवानगी मिळेल, या अपेक्षाने बॉम्बे डान्स संचाने आपली तयारी सुरूच ठेवली आहे.
पालखी पूजनाने गुरुवारपासून श्री खंडोबाच्या माळेगाव यात्रेस प्रारंभ झाला आहे. या यात्रेत गुरुवारी कृषी प्रदर्शनही भरविण्यात आले होते. त्याचवेळी आज शुक्रवारी अश्व श्वान कुकुट प्रदर्शन आणि महिला तसेच बालकांसाठी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या विविध विभागाकडून या ठिकाणी प्रदर्शनी लावण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनीमध्ये शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कारही या यात्रेदरम्यान केला जाईल. २३ डिसेंबर रोजी लावणी महोत्सव तर २३ डिसेंबर रोजी कुस्त्यांची दंगल होणार आहे. २४ डिसेंबर रोजी पारंपारिक लोक कला महोत्सव आणि २५ डिसेंबर रोजी शंकरपटाचे आयोजन या यात्रेदरम्यान करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमांसह यात्रेमध्ये गेल्या काही वर्षापासून बॉम्बे डान्सचेही मोठ्या प्रमाणात आगमन झाले आहे. परवडेल अशा ५० रुपयात तीन गाणे असा या बॉम्बे डान्सचा प्रकार आहे. या बॉम्बे डान्सच्या माध्यमातून अनेक हौशी कलावंत आपली मनोरंजनाची भूक भागवत असतात. गेल्या काही वर्षात ही बॉम्बे डान्सची परंपरा माळेगावात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे सध्या कार्यरत असलेले नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक असताना त्यांनी या बॉम्बे डान्सला परवानगी दिली नव्हती. परंतु त्यांचा नांदेड येथील कार्यकाळ संपताच पुन्हा एकदा बॉम्बे डान्सला ‘अच्छे दिन’ आले. यावर्षीही माळेगावात बॉम्बे डान्सचे संच दाखल झाले आहेत या संचांनी आपली तयारी सुरू केली आहे. कलाकारही सध्या लोहा येथे मुक्कामी आहेत. पोलिसांकडून अद्याप परवानगी न मिळाल्याने त्यांची तयारी अर्धवटच आहे.
या बॉम्बे डान्सला परवानगीची बोलणी वेगवेगळ्या स्तरावरून सुरू असल्याची बाबही पुढे आली आहे. सकारात्मक बोलणी सुरू असल्याची बाबही पुढे आली आहे. माळाकोळी पोलीस ठाण्यात एकेकाळी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून ही बोलली अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे एक दोन दिवसात ही परवानगी मिळून जाईल, अशी अपेक्षा एका संचाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे माळेगावात पुन्हा एकदा बॉम्बे डान्स सुरू होईल, अशीच शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्षात बॉम्बे डान्स हा अश्लीलतेला वाव देणारा कलाप्रकार असल्याची टीका काही गेल्या काही दिवसापासून केली जात आहे; परंतु मनोरंजनात्मक बाब म्हणून त्याला आता अघोषित मान्यता देण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यात बॉम्बे डान्सला राजाश्रय असल्यानेही परवानगीसाठी कोणताही अडथळा येणार नाही, असेही सांगितले जात आहे.



