नांदेड जिल्हा

‘ऑरेंज अलर्ट’ च्या पार्श्वभूमीवर शनिवारी नांदेड जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी

अतिवृष्टीमुळे आपात्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश, खाजगी शिकवणी, अंगणवाड्याही बंद ठेवल्या जाणार

नांदेड – प्रादेशिक हवामान विभागाने उद्या शनिवारी नांदेड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विना अनुदानिक शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालय, खाजगी शिकवणी तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना २७ सप्टेंबर रोजी सुट्टी घोषित केली आहे
प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यातील त्या त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील ठराविक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या पूर्व सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यास उद्या २७ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला असून जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प पूर्णपणे भरलेले आहेत. सर्व नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग चालू आहे तसेच जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी इशारा पातळी गाठलेली असल्याने नांदेड जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. नांदेड जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी बंद ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सुट्टीचे आदेश काढले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!