
जिल्ह्यातील ग्रामीण भागात धर्माबाद तालुक्यातील बेलूर पुलावरून पाणी वाहत आहे. अर्धापूर तालुक्यातील शेलगाव या गावाचा संपर्क तुटला आहे. मुखेड तालुक्यातील शिकारा येथे राहत्या घरावर पिंपळाचे झाड पडून घराचे मोठे नुकसान झाले आहे. देगाव, बाऱ्हाळी- मुक्रमाबाद- निवळी येथे पुलावरून पाणी वाहत आहे. बेरळी रस्ता ही बंद झाला आहे. लोहा तालुक्यातील उमरा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने उमरा ते रूपसिंग तांडा, परसराम तांडाकडे वाहतूक बंद आहे. देऊळगाव व चितळी येथे ओढ्यास पूर आला आहे. धनंज खुर्द येथील पुलावरून पाणी जात असल्याने संपर्क तुटला आहे. सोनखेड हद्दीतील निळा, डेरला या गावचाही संपर्क तुटला आहे. उस्माननगर पोलीस स्टेशन हद्दीतील जोशीसांगवीमधील पुलावरून पाणी जात आहे. डोंगरगाव येथील घोटका येथे जाणारा पूल पाण्याखाली आहे. दोन मंदिरात पाणी शिरले असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पाणी आले आहे. चोंडी येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे. धानोरा – खांबेगाव येथे पुलावरून पाणी वाहत आहे. भेंडेगाव येथे पुराच्या पाण्यात झाडावर अडकून पडलेल्या एका व्यक्तीस स्थानिक शोध आणि बचाव पथकामार्फत बाहेर काढण्यात आले आहे. कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. देगलूर तालुक्यात जवळपास आठ गावांमध्ये पुलावरून पाणी जात असल्याने तात्पुरत्या स्वरूपात येथील संपर्क तुटला आहे. नांदेड तालुक्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे राहेगाव येथे पुलावरून पाणी जात असल्याने संपर्क तुटला आहे. वाणेगाव ते वरखेड हा रस्ता बंद झाला आहे. कासारखेडामार्गे एकदरा जाणारा नाला भरल्यामुळे रस्ता बंद करण्यात आला आहे. निळा- एकदरा पुलाच्या बाजूने पाणी वाहत असल्याने तो रस्ता बंद झाला आहे. तळणी ते दरेगाव हा रस्ता पुराच्या पाण्यामुळे बंद झाला आहे. पिंपळगाव खुर्द आहेत कोरका येथे कॅनॉल फुटल्याची घटनाही पुढे आली आहे. हदगाव तालुक्यात शेंबाळपिंपरी ते तळणी हा रस्ता बंद झाला आहे.
विष्णूपुरी प्रकल्पात जायकवाडी, माजलगाव, सिद्धेश्वर, निम्न दुधना आणि खडकपूर्णा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. विष्णूपुरी प्रकल्पामध्ये सध्या १ लाख ६० हजार क्युसेसची आवक सुरू आहे. पुढील सहा ते सात तासात ही आवक तीन लाख क्युसेसपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या विष्णूपुरी प्रकल्पातून १ लाख ६० हजार क्युसेस विसर्ग गोदापात्रात सोडण्यात आला आहे. हा विसर्ग येत्या पाच ते सहा तासात अडीच ते तीन लाख क्युसेसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नांदेड शहरालगत गोदावरी नदीची पातळी इशारा २५१ मीटरच्या वर जाण्याची शक्यता आहे. नांदेड शहर तसेच गोदावरी काठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.



