राजकीय

स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपाकडून नांदेडमध्ये आता महायुतीच्या नेत्यांना सामंजस्याची भूमिका घेण्याचे आवाहन..!

भाजपाचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर यांनी महायुतीची करून दिली आठवण, अशोक चव्हाण यांच्याबाबत चुकीचे गैरसमज पसरवू नका याबाबतही केली विनंती

नांदेड – नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने गेल्या तीन महिन्यापासून जय्यत तयारी सुरू केली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर पहिल्या बैठकीपासूनच त्यांनी आक्रमक भूमिका घेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्यात येतील, अशी घोषणा केली, तशी तयारीही केली जात आहे. पण त्याचवेळी महायुतीतील शिवसेनेचे दुसरे नेते हेमंत पाटील यांनी थेट अशोक चव्हाण यांचे नाव घेऊन त्यांच्यावर आरोपाच्या फैरी गेल्या काही दिवसापासून सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आक्रमक मानले जाणारे भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी हेमंत पाटील यांना संयमाची भूमिका घ्यावी, अशोक चव्हाणाबाबत गैरसमज पसरविणारी वक्तव्य करू नयेत अशी विनंती केली आहे. त्यामुळे भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांची ही नरमाईची भूमिका आश्चर्यजनक मानली जात आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पहिल्या टप्प्यात १० नोव्हेंबरपासून नांदेड जिल्ह्यातील बारा नगरपरिषदांच्या निवडणूक प्रक्रियेत अर्ज भरण्यासही प्रारंभ झाला आहे. दुसरा टप्प्यात जिल्हा परिषद अथवा महापालिकेच्या निवडणुका होतील हे स्पष्ट आहे.  नांदेडमध्ये या निवडणुका स्वबळावर लढल्या जातील, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाने पहिल्या टप्प्यातच घेतली होती. त्या घोषणेला शिवसेनेनेही आक्रमक पद्धतीने उत्तर दिले होते. शिवसेना नेते हेमंत पाटील यांनी थेट अशोक चव्हाणांवर शाब्दिक हल्ला चढवत आरोपांच्या फैरी झाडल्या. महायुतीतील दुसरे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही अशोक चव्हाण यांचा उल्लेख थेट ‘रावण’ असा करून नांदेडमधील रावण जनतेने ओळखावा असे आवाहन नांदेडकरांना नुकत्याच झालेल्या दसरा महोत्सवादरम्यान केले होते.

शिवसेना नेते हेमंत पाटील यांनी प्रारंभापासूनच घेतलेली आक्रमक भूमिका कायम ठेवत रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात पुन्हा एकदा नांदेड शहरातील मोक्याच्या जागा या महापालिकेच्या माध्यमातून थेट अशोक चव्हाण यांनी बिल्डरांच्या घशात टाकून करोडो रुपये कमावले, असा आरोप केला. या प्रकारात त्या त्या काळातील महापालिका आयुक्तांचाही सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला. सत्तेच्या माध्यमातून हे सर्व प्रकार नांदेडमध्ये घडले आहेत. यातून बिल्डर मोठे झाले आणि सामान्य नागरिक रस्त्यावर आले असा आरोप हेमंत पाटील यांनी केला. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील महापालिकेत हे सर्व प्रकार घडले, या सर्व प्रकारांची चौकशी झाल्यास मोठा घोटाळा पुढे येईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.

हेमंत पाटील यांच्याकडून थेट अशोक चव्हाणांवर झालेल्या या आरोपांना भारतीय जनता पक्षाकडून जशास तसे उत्तर मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र ही अपेक्षा पूर्णतः फोल ठरली आहे. अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक आणि सध्याचे भारतीय जनता पक्षाचे नांदेड महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर हे आक्रमक नेते मानले जातात. नांदेडमध्ये त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकीत ‘जशास तशी’ भूमिका घेतली होती. मात्र पहिल्यांदाच त्यांनी महायुतीतील शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांनी थेट माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव घेऊन केलेल्या आरोपाला अत्यंत नरमाईने उत्तर दिले आहे. त्यांनी दिलेल्या एका निवेदनात राज्यात महायुतीचे सरकार असल्याचे स्पष्ट करताना आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी अशोक चव्हाण यांच्याविषयी गैरसमज पसरविणारे विधान करू नये, अशी विनंती ही त्यांनी हेमंत पाटील यांना केली आहे. समाजमाध्यमातून त्यांनी केलेली ही विनंती नांदेडकरांच्या मात्र पचनी पडली नाही, असेच स्पष्ट झाले आहे. माजी आमदार राजूरकरांच्या यांनी आपल्या मूळ स्वभावाला मुरड घालून केलेली विनंतीची ही भाषा नेमकी कशामुळे? असा प्रश्नही पुढे आला आहे.

यासाठी भारतीय जनता पक्षाने नुकत्याच केलेल्या काही निवडी त्यास कारणीभूत असल्याची चर्चाही होत आहे. पक्षपातळीवर नांदेड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची संपूर्ण जबाबदारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर सोपविली आहे. त्याचवेळी नांदेड महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी खासदार डॉ. अजित गोपछडे यांना दिली आहे तर नांदेड उत्तरची जबाबदारी आमदार श्रीजया चव्हाण आणि नांदेड दक्षिणची जबाबदारी ही आमदार राजेश पवार यांना सोपवली आहे. या बदलातूनच नरमाईची ही भूमिका घेतली काय? असा सवाल पुढे येत आहे. त्यामुळे आगामी काळात आमदार राजूरकरांकडून विरोधकांना जशास तसे उत्तर मिळेल की नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!