महापालिका

नांदेडमध्ये शंभर दिवस कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महापौर कविता मुळे सरसावल्या..!

माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या संकल्पनेतील नांदेड प्रत्यक्षात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाला दिल्या सूचना, विभागनिहाय मॅरेथॉन बैठकांना प्रारंभ 

नांदेड – महापालिकेत पदग्रहणानंतर महापौर कविता मुळे यांनी प्रशासकीय पातळीवर पहिल्यांदाच शुक्रवारपासून आढावा बैठकांना प्रारंभ केला आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या संकल्पनेतील नांदेड प्रत्यक्षात आणण्यासाठी आता महापौर मुळे या सरसावल्या आहेत. शुक्रवारी पाणीपुरवठा, स्वच्छता यासह विद्युत विभागाची बैठक घेण्यात आली शनिवारी इतर विभागांचे बैठक होणार असल्याचे महापौर कविता मुळे यांनी स्पष्ट केले.

नांदेड महापालिकेत स्थापनेपासून पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे. नांदेडच्या १५ व्या आणि भाजपच्या पहिल्या महापौर म्हणून कविता मुळे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. १० फेब्रुवारी रोजी महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपक सिंह रावत तसेच सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे यांचा पदग्रहण सोहळा माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. गेल्या दहा दिवसात महापौर कविता मुळे यांनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन शहरातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नांदेड शहरातील प्रमुख शांतीधाम स्मशानभूमी, शहर स्वच्छता, रस्ते या मूलभूत सुविधांची त्यांनी पहिल्या टप्प्यातच पाहणी केली.

प्रत्यक्ष पाहणीनंतर महापौर कविता मुळे यांनी महापालिकेच्या विविध विभागांतर्गत चालणाऱ्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी २० आणि २१ फेब्रुवारी रोजी आढावा बैठक बोलावली. या आढावा बैठकीस आयुक्तांसह इतर सर्व विभागप्रमुखांना स्वतः उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. या आढावा बैठकीस उपस्थित राहताना आपल्या विभागाचे कामकाज योजना विभागांचा निधी प्रस्तावित आणि प्रलंबित कामे तसेच विविध विकासात्मक बाबींसाठी शासन स्तरावरून निधी मागणीचे प्रस्ताव यासंदर्भात बैठकीत सादरीकरण करण्याबाबतही कळविले होते.

त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता स्थायी समिती सभागृहात महापौर कविता मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम, विभाग पाणीपुरवठा मल:निसारण विभाग, विद्युत विभाग, स्वच्छता विभाग या प्रमुख विभागांची बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम निलेश सुंकेवार, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, उपायुक्त नितीन गाढवे, अभिजीत वायकोस, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, उप अभियंता प्रकाश कांबळे, सहायक आयुक्त गुलाम सादेक यांच्यासह शहरातील सर्व क्षेत्रीय अधिकारी विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.

शहराला किमान एक दिवसाआड तरी पाणी पुरवठा करा…या बैठकीत प्रामुख्याने शहराला पाणीपुरवठा करताना आता किमान एक दिवसाआड तरी पाणीपुरवठा झाला पाहिजे, अशी सूचना देण्यात आली; तर शहरात कुठेही स्वच्छतेचा प्रश्न उद्भवू नये याबाबतही ताकीद देण्यात आली आहे. विद्युत व्यवस्थेअंतर्गत शहरातील सर्व प्रमुख आणि अंतर्गत रस्ते तसेच वस्त्यांमध्ये विद्युत व्यवस्था कायम ठेवावी, त्याचवेळी विद्युत देयक कमी करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याबाबतही महापौर कविता मुळे यांनी प्रशासनाला सूचित केले आहे. यावेळी सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे तसेच उपमहापौर दीपकसिंह रावत यांनीही शहरातील मूलभूत सुविधांमध्ये तसेच विकास कामांमध्ये आवश्यक सूचना केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!