
नांदेड – जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या पावसाने जिल्हाभरात पूर परिस्थिती उद्भवली असून पुराचा मोठा फटका किनवट, हिमायतनगर, हदगाव, माहूर, अर्धापूर, नांदेड या तालुक्यांना बसला आहे. किनवट तालुक्यात जवळपास ६०० घरांमध्ये पाणी शिरले असून मदतकार्याद्वारे सहा जणांची पुरातून सुटका केली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी गाव आणि तालुक्याला जोडणारे रस्ते पुरामुळे बंद पडले आहेत. रविवारी पावसाने विश्रांती घेतल्याने पूर परिस्थिती कमी झाल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीत जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी ऑन फिल्ड होते. त्यामुळे मदतकार्यात आणि बचावकार्यात कोणतीही कुचराई झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विष्णूपुरी प्रकल्पासह परिसराची पाहणी करून आवश्यक त्या सर्व सूचना संबंधितांना दिल्या आहेत. अधिनस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही बचाव कार्य तसेच पंचनाम्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांनीही पूरग्रस्त भागांना भेटी देऊन नागरिकांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील २४ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे सर्वाधिक २५५.५० मिलिमीटर पाऊस किनवट तालुक्यातील सिंदगी महसूल मंडळात एकाच दिवशी नोंदवण्यात आला आहे. नांदेड, अर्धापूर, भोकर, माहूर, किनवट, हिमायतनगर या तालुक्यातही अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
किनवट तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस आला आहे. तालुक्यातील सहा मंडळात अतिवृष्टीचे नोंद झाली आहे. तालुक्यात सरासरी १०३.९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी स्कूल बसचालक प्रेमसिंग मोहन पवार वय अंदाजे ४० वर्षे हा पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अन्य सहा जणांना प्रशासनाने तसेच स्थानिक नागरिकांनी वाचवले आहे. त्यामध्ये बद्रीनाथ मुंडे, धनराज पडवळ रा.बोधडी, धनराज मंगला पडवळ, वाळकी बोधडी, यहिदा बेगम गुलाम दस्तगीर खान वय ७०, अंजुम परविन वय ४०, तरन्नुम गुलाम दस्तगीर वय २८, महक सय्यद नईम वय २० आणि एका चिमुकलीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. किनवट शहरातील नालागड्डा, मोमीनपुरा, मामीलगुडा, रामनगर, गंगानगर तसेच ग्रामीण भागातील प्रधानसांगवी, दुधगाव, कोल्हारी, बुरुकुलवाडी अंबाडी, जवरला, पार्डी खू. आदी गावामध्ये जवळपास ६०० घरामध्ये पाणी शिरले होते.
शहरी भागातील घरात पाणी शिरलेल्या कुटुंबाची व्यवस्था किनवट शहरातील विविध भागांमध्ये करण्यात आली होती. पैनगंगा नदीवरील पुलावरून पाहणी वाहत असल्यामुळे किनवट – उमरखेडचा संपर्क तुटला होता. किनवट शहराजवळील पूल खरडून गेल्याने किनवट- उमरखेड वाहतूक बंद आहे. इस्लापूर ते शिवणी, आप्पाराव पेठ, मलकजाम कंचली, गोंडजेवली आदी गावातील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटला आहे. दरम्यान माळबोरगाव येथे १६ ऑगस्ट रोजी अर्जुन मोतीराम कुसराम हे शेतामध्ये काम करत असताना अचानक वीज पडली. त्यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी आदीलबाद येथे हलवण्यात आले आहे. माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीवर मराठवाडा विदर्भाला जोडणारा रस्ता रेणुका मंदिर माहूरगड जो वाहतुकीस बंद होता तो दुपारी सुरू झाला आहे.
मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पांतर्गत रावणगाव, हातराळ, भिंगोली, भासवाडी, भाटापूर येथील नागरिकांना सतर्कतचा इशारा दिला आहे. लोहा तालुक्यातील उंबरा लाडका रुपसिंग तांडा ते भिवरा नदी ओसंडून वाहत आहे. नायगाव तालुक्यातील कुंटूर परडवाडी हा रस्ता दुपारपासून पाणी आल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. अर्धापूर तालुक्यात पुलाच्या बाजूचा रस्ता खचल्यामुळे पार्डी – देळूब हा रस्ता बंद करण्यात आला आहे. सांगवी येथील पुलावरून पाणी वाहत आहे. शेलगाव, सांगवी बु., सावरगाव, गणपुर, उमरी, कोंढा, पार्डी, देळूब आदी गावांना भेट देऊन पूर परिस्थितीची प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली आहे.
नांदेड – मालेगाव रस्त्यावरील पासदगाव येथे आसना नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे सध्या हा रस्ता बंद करण्यात आला आहे. पासदगाव येथील आसना नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने नांदुसा, खुरगाव बाजूस बेरिगेटिंग करण्यात आली आहे. पासदगाव येथे आसना नदीला पूर आला आहे. वाहतूक बंद करण्यात आली आहे. बोंढार तर्फे नेरली येथे आसना नदीला पूर आल्यामुळे पुराचे पाणी शेतामध्ये जाऊन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. निळा एकदरा रोड आसना नदीच्या पुरामुळे बंद झाला आहे. निळा- वसमत रोडवर आलेगाव येथे मागच्या वर्षी पूल झाल्यामुळे रस्ता सुरळीत सुरू आहे; पण आजूबाजूच्या शेतामध्ये आसना नदीचे पाणी शिरले आहे. वाहतूक आणि सुरक्षेकरिता पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. संबंधित मंडळाधिकारी आणि तलाठी घटनास्थळी उपस्थित आहेत.



