
नांदेड – नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने उद्या ११ ऑक्टोबर रोजी मिशन समाधान अंतर्गत तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला आहे. या तक्रार निवारण दिनात पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी ठाणे स्तरावर उपस्थित राहून सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेणार आहेत. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एक प्रकारे हा जनता दरबारच ठरणार आहे. नांदेड जिल्ह्यातील ११ पोलीस ठाण्यात होणाऱ्या या जनता दरबारमध्ये नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या तक्रारींचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. गुन्हेगारी रोखण्यासाठी ऑपरेशन फ्लश आऊट हाती घेण्यात आले आहे. मिशन सहयोग अंतर्गत पोलीस दलाच्या वतीने वेगवेगळे आठ उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. मिशन समाधानांतर्गत ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत तक्रार निवारण दिन पोलीस ठाणे स्तरावर आयोजित करण्यात आला आहे. या तक्रार निवारण दिनास खुद्द पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह जिल्ह्यातील अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी वेगवेगळ्या ठाण्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत नागरिकांना ठाणे स्तरावरील आपल्या तक्रारीचे निरसन करून घेता येणार आहे.
नांदेड पोलीस दलाच्या वतीने आयोजित या तक्रार निवारण दिनामध्ये भाग्यनगर पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार हे नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतील तर शिवाजीनगर ठाण्यात अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव हे उपस्थित राहतील. वजीराबाद ठाण्यात नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने, नांदेड ग्रामीण ठाण्यात इतवारा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे, कंधार ठाण्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप, देगलूर ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, बिलोली पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर, धर्माबाद पोलीस ठाण्यात उपविभागीय अधिकारी दशरथ पाटील, भोकर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी दगडू हाके, किनवट पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे आणि माहूर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे या नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यांचे निरसन करणार आहेत.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या संकल्पनेतून आयोजित या जनता दरबारमध्ये नागरिकांना आता थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपुढे आपले गाऱ्हाणे मांडता येणार आहे. पोलीस दलाच्या वतीने पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबारमध्ये आता शनिवारी किती तक्रारी प्राप्त होतात, त्यांचे निरसन कशाप्रकारे केले जाते याकडेही लक्ष लागले आहे.



