नांदेड जिल्हा

नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी उद्या ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार 

तहसील कार्यालय, पंचायत समिती यासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर मतदार यादी उपलब्ध राहणार, १४ ऑक्टोबरपर्यंत हरकती आणि सूचना विचारात घेतल्या जाणार

नांदेड – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेची लगबग प्रशासकीय पातळीवर वेगात सुरू आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची गट आणि गण रचना अंतिम झाल्यानंतर आता प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. ही मतदार यादी संबंधित तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध केली जाणार आहे.

जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. जिल्हा परिषदेची गट आणि पंचायत समितीची गण रचना अंतिम करण्यात आली आहे. महापालिकेच्या प्रभाग रचनेवरही सुनावणी पूर्ण झाली असून ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान प्रभाग रचना अंतिम केली जाणार आहे. नगरपालिकांच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण नुकतेच घोषित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गण रचनेबाबतही आता आरक्षण प्रक्रिया सुरू आहे. त्यात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नांदेड जिल्हा परिषद तसेच त्या अंतर्गत १६ पंचायत समितीची समितीची सार्वत्रिक निवडणुकीची मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. ८ ऑक्टोबर रोजी संबंधित तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर ही मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रारूप मतदार यादीवर कोणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्यासंबंधी हरकती आणि सूचना संबंधित तहसीलदार यांच्याकडे १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सादर कराव्या लागणार आहेत. त्यानंतर आलेल्या हरकती आणि सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले आहे.

इच्छुकांकडून विजयाची गणित मांडली जाणार..! जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होताच आता इच्छुकांकडून विजयाची गणित मांडली जाणार आहेत. आपल्या गट व गणात कोणत्या प्रवर्गातील किती मतं आहेत, त्यातील किती मतं आपल्याला मिळतील विरोधकांना किती मिळतील यातून आपल्या विजयासाठी नेमकं काय करावे लागणार यासाठी वेगवेगळे गणित इच्छुक उमेदवारांकडून मांडण्यात येतात त्या गणितांची आखणी सध्या सुरू आहे. विजयासाठी आवश्यक असलेली मते कसे प्राप्त करायचे याचा आराखडा तयार केला जात आहे. जवळपास तीन वर्षानंतर होत असलेल्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची ग्रामीण भागात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!