नांदेड जिल्हा

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबाबतीत घटनेचा नांदेड जिल्हा वकील संघाच्या वतीने निषेध 

नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाने निषेधाचा ठराव घेऊन न्यायालयीन कामकाज ठेवले बंद, जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर वकील संघाची निदर्शने 

नांदेड – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. या घटनेचा नांदेड जिल्हा संघाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. जिल्हा वकील संघाने या घटनेच्या निषेधाचा ठराव घेत मंगळवारी कामकाज बंद ठेवले. त्याचवेळी जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर वकील संघाच्या वतीने निदर्शनेही करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू असताना सोमवारी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने वकील राकेश किशोर तिवारी याने बूट फेकण्याचा प्रयत्न केला; मात्र वेळीच त्याला सुरक्षारक्षकाने पकडून बाहेर काढले. या घटनेमुळे न्यायसंस्थेचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला आहे. नांदेड जिल्हा वकील संघाने या घटनेचा निषेध केला आहे. भारतीय न्यायसंस्थेचा सन्मान आणि स्वायत्तता हा लोकशाहीच्या मूलभूत आधार स्तंभापैकी एक आहे. सर्वोच्च न्यायालयासारख्या पवित्र संस्थेत अशा प्रकारचे असभ्य आणि अमानवीय कृत्य कोणत्याही परिस्थितीत ग्राह्य धरता येणार नाही. न्यायव्यवस्थेवर अशाप्रकारे अपमानास्पद वर्तन करणाऱ्या व्यक्तीच्या वृत्तीचा जिल्हा वकील संघाने प्रखर निषेध केला आहे. अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही जिल्हा वकील संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

या निषेधार्थ ७ ऑक्टोबर रोजी जिल्हा वकील संघाच्या सर्व सदस्यांनी या घटनेचा निषेध करून न्यायालयीन कामकाज बंद ठेवले. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या घटनेचा निषेधाचा ठरावही पारित करण्यात आला. यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. आशिष गोधमगावकर, उपाध्यक्ष ॲड. संजय वाकोडे पाटील, सचिव ॲड. अमोल वाघ, कोषाध्यक्ष ॲड. मारुती बागलगावकर, महासचिव ॲड. रशीद पटेल, विशिष्ट सहाय्यक ॲड. जयपाल ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान, निषेधाच्या ठरावानंतर जिल्हा वकील संघाच्या वतीने नांदेड जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शनेही करण्यात आली. या निदर्शनामध्ये ॲड. यशोनील मोगले, ॲड. जयपाल ढवळे, ॲड. गौतम किनीकर, ॲड. प्रवीण खिल्लारे, ॲड. अभिमान राऊत, ॲड. रशीद पटेल, ॲड. साळवे, ॲड. संतोष जोंधळे आदींचा सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!