
नांदेड – नांदेड महापौर पदाच्या निवड प्रक्रियेला प्रशासकीय पातळीवर आजपासून सुरुवात होत आहे. १० फेब्रुवारी रोजी महापौरांची निवड होणार आहे. या पदासाठी आज गुरुवारी इच्छुक उमेदवारांना अर्ज घेता येणार आहेत. उमेदवारांचे अर्ज ६ फेब्रुवारी रोजी स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी विशेष सभेत महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. महापालिका स्थापनेनंतर पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा महापौर महापालिकेत विराजमान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापौर पदासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा शब्द अंतिम की भाजपा कोअर कमिटी हा प्रश्नही आता पुढे आला आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यस्तरीय कोअर कमिटी नांदेडचा महापौर निवडेल, असे वक्तव्य करून नांदेडमध्ये संभ्रम निर्माण केला आहे.
नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भारतीय जनता पक्षाने स्वबळावर ४५ जागा आणल्या आहेत. त्याचवेळी निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गटानेही भाजपाला पाठिंबा देत ४ सदस्य भाजपासोबत जोडले आहेत. त्यामुळे महायुतीची सदस्य संख्या आता ४९ वर पोहोचली. दुसरीकडे महापालिकेत एमआयएमने १४ जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. काँग्रेसला १०, वंचित बहुजन आघाडीला ५, राष्ट्रवादी अजित पवार गट दोन आणि एका अपक्षालाही संधी मिळाली आहे.
नांदेड महापौर पदाची निवडणूक १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत होणार आहे. जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या विशेष सर्वसाधारण सभेत महापौर पदाची निवडणूक होणार आहे. सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सभागृहात ही विशेष सर्वसाधारण सभा होईल. महापौर पदासाठी हात वर करून मतदान घेण्यात येणार आहे. महापौर पदासाठी आज ५ फेब्रुवारी रोजी इच्छुक उमेदवारांना अर्ज घेता येणार आहेत. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत त्यामुळे 6 फेब्रुवारी रोजी महापौर पदासाठी भाजपाकडून कोण उमेदवारी दाखल करणार याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे 6 फेब्रुवारी रोजी नांदेड चा महापौर कोण होईल हे स्पष्ट होईल त्यावर दहा फेब्रुवारी रोजी शिक्कामोर्तब होणार आहे.
माजी मुख्यमंत्री तथा भाजप नेते अशोकराव चव्हाण हे केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनास हजेरी लावून बुधवारी रात्री नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी नगरसेवकांची बैठकही घेतली आहे. आजही महापौर निवडीवर चर्चा सुरू राहील. ६ फेब्रुवारी कुणाला अर्ज भरण्याचे आदेश दिले जातील हे पाहावे लागणार आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाकडून प्रदेश पातळीवरूनच महापौर पदाचे नाव घोषित केले जात आहे. स्थानिक पातळीवरून नावे पाठविली जात आहेत. त्यातील एक नाव अंतिम करून प्रदेश पातळीवरून सूचना दिल्या जात आहेत. बुधवारी झालेल्या बैठकीत नगरसेवक प्रतिनिधींची महापौर पदाबाबतची मते जाणून घेण्यात आली. यापूर्वीच्या बैठकीत निवडून आलेल्या महिला सदस्यांशीही चर्चा करण्यात आली होती. ही चर्चा वन-टू-वन या पद्धतीने झाली.
भारतीय जनता पक्षाची महापालिकेवर पहिल्यांदाच सत्ता आल्यानंतर भाजपाचा महापौर पहिला म्हणून महिलेला संधी मिळणार आहे. या पदासाठी दुसऱ्यांदा निवडून आलेल्या ज्योती किशन कल्याणकर, कविता संतोष मुळे, सुदर्शना महेश खोमणे, अनुराधा राजू काळे, वैशाली मिलिंद देशमुख यांच्यासह शांभवी प्रवीण साले यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. ज्योती कल्याणकर आणि कविता मुळे या पूर्वी काँग्रेसकडून निवडून आल्या आहेत. अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांनीही भाजपात प्रवेश केला तर सुदर्शना महेश खोमणे, शांभवी साले, वैशाली देशमुख या भाजपाच्याच आहेत. त्यामुळे आता महापौर पदासाठी संधी देताना कुणाला प्राधान्य दिले जाईल हे पाहण्यासाठी शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत वाट पहावी लागणार आहे. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी महापौर पदासाठी अनुभवाला प्राधान्य द्यावे लागेल, हे प्रारंभीपासूनच स्पष्ट केले आहे. महापौर पदासाठी भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरूनही नाव देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. असे झाल्यास शांभवी प्रवीण साले अथवा सुदर्शना महेश खोमणे यांचे नावही महापौर म्हणून पुढे येऊ शकते.



