
अनुराग पोवळे
नांदेड – भाजपाने आज १३ मार्च रोजी जाहीर केलेल्या लोकसभा उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत नांदेड लोकसभा मतदार संघासाठी विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. लातूर येथील सुधाकर श्रृंगारे यांच्यासह जालना येथे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर बीडमध्ये विद्यमान खासदार प्रीतम मुंडे ऐवजी पंकजा मुंडे यांना लोकसभा उमेदवारीसाठी संधी दिली आहे. जाहीर झालेल्या या यादीमुळे भाजपाचा नांदेडचा उमेदवार कोण… या चर्चेवर पडदा पडला आहे.
‘अबकी बार ४०० पार’ चा नारा देत विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी भाजपाने मागील वर्षभरापासून तयारी सुरू केली आहे. लोकसभेच्या प्रत्येक जागेसाठी उमेदवाराची निवड ‘विजयी होणारा उमेदवार’ याच निकषावर केली जात आहे. पक्षाने घोषित केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत दिल्लीसह अनेक ठिकाणच्या विद्यमान खासदारांना तिकीट नाकारून नवे चेहरे तिथे मैदानात आणले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील यादीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. भाजपने आज दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील २० उमेदवारांची घोषणा केली. त्यात मराठवाड्यातील ४ जागांचा समावेश आहे.
नांदेडमध्ये विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी मिळेल की नाही याबाबत पक्षातीलच एका गटाकडून शंका व्यक्त केली जात होती. यासाठी सर्वेचा दाखला दिला जात होता. माध्यमांमध्येही सर्वेचा दाखला देत अनेकदा चिखलीकर यांच्या उमेदवारी बाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. किंबहुना ती मिळणारच नाही अशी भूमिका घेतली जात होती.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर आठवडाभरातच महापालिकेचे ५५ माजी नगरसेवक, काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, जिल्हाभरातील काँग्रेसच्या मंडळींनी भाजपामध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. भाजपात आणखी एका गटाची भर पडली, असे चित्रही रंगवण्यात आले. त्यातच भाजपाच्या पक्ष निरीक्षकांपुढे उमेदवारीसाठी मुलाखती देणाऱ्यांमध्ये विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह प्रामुख्याने डॉ. मीनाताई खतगावकर, राम पाटील रातोळीकर, संतुक हंबर्डे यांचा समावेश होता.
उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या डॉ मीनलताई खतगावकर यांनी थेट गृहमंत्री अमित शहा यांची छत्रपती संभाजीनगर येथे आठवडाभरापूर्वी भेट घेतली होती. डॉ . मीनलताई यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडीत त्यांनाही भाजपामध्ये प्रवेश करावा लागला. भाजपा प्रवेशानंतर त्यांनी लगोलग नांदेड लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारीची मागणी केली होती. त्यामुळे आता खा. चिखलीकरांना उमेदवारी मिळेल की डॉ. मीनलताई यांना याचीच चर्चा होत होती.
पक्षांतर्गत विरोधकांनीही खा. चिखलीकर यांना पुन्हा तिकीट मिळणे अवघड असल्याचे चित्र उभे केले होते. मात्र पक्षाने खा. चिखलीकर यांच्या कार्याची योग्य दखल घेतली. खासदार चिखलीकर यांना माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे मोठे पाठबळ होते. हे चिखलीकर यांना पुन्हा एकदा मिळालेल्या उमेदवारीतून सिद्ध झाले आहे. त्यातच चिखलीकरांचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील विजयी इतिहासही न विसरण्यासारखाच होता. ‘जायंट किलर’ ठरलेले खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी नाकारणे हे पक्षासाठीही अवघडच होते. त्यामुळे पुन्हा एकदा चिखलीकर यांना पक्षाने नांदेड लोकसभा मतदारसंघ रिंगणात आणले आहे. चिखलीकर यांना आता विरोधी पक्षाच्या उमेदवारासोबतच पक्षांतर्गत विरोधकाशीही दोन हात करावे लागणार आहेत. आगामी काळात पक्षांतर्गत विरोधक हे कोणता डाव टाकतात याकडेही राजकीय विश्लेषकांचे लक्ष राहणार आहे. तूर्त प्रतापरावांनी उमेदवारीची पहिली लढत एकतर्फीच जिंकली हे स्पष्ट झाले आहे.