
नांदेड: डायट नांदेड येथील माजी विषय सहायक तथा जिल्हा परिषद शाळा धारेगाव येथील शिक्षक संतोष केंद्रे यांना १६ मार्च रोजी शिलॉंग (मेघालय) येथे आयोजित अखिल भारतीय बाल ई साहित्य स्पर्धेत ‘ऑक्सिजन’ या लघुपटासाठी प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर जिल्हा परिषद शाळा नूतन भोकरचे शिक्षक मिलिंद जाधव यांच्या ऑडिओला ज्युरी ॲप्रिसिएशन हा राष्ट्रीय पुरस्कार मेघालय सरकारचे शिक्षण मंत्री रक्कम पी.संगमा यांच्यासह राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद दिल्ली येथील प्रोफेसर दिनेश प्रसाद सकलानी, केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक अर्मेंद्र बेहरा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
‘ऑक्सिजन’ हा लघुपट वाढत्या प्रदूषण आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या ऑक्सिजनच्या कमतरतेवर भाष्य करणारा आहे. यात भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य अडचणींचे चित्रण करण्यात आले आहे.
नांदेड जिल्हा प्रशासनाने दोन्ही शिक्षकांचे पुरस्कारासाठी अभिनंदन केले आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दोन्ही शिक्षकांनी मिळवलेल्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
केंद्रे यांनी हा पुरस्कार त्यांचे दिवंगत वडील यांना समर्पित केला आहे. यापूर्वीही त्यांना ‘भूक’ आणि ‘बदल’ या लघुपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. “हा पुरस्कार मिळाल्याने मला अत्यंत आनंद झाला आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी आहे आणि भविष्यातही असेच दर्जेदार लघुपट बनवण्याचा प्रयत्न करेन,” अशी प्रतिक्रिया केंद्रे यांनी पुरस्कारानंतर दिली.