
नांदेड:- महापालिका हद्दीत दर मंगळवारी कौठा भागात भरणाऱ्या आठवडी बाजाराचे स्थलांतर करण्यात आले आहे. आता हा आठवडी बाजार साईबाबा मंदिराकडे जाणाऱ्या गॅस गोडाऊन कॉर्नरपासून ते वसरणी रोड दूध डेअरीपर्यंत रस्त्याच्या बाजुस भरविण्यात आला. मंगळवारी महापालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने जंबो कारवाई करत वसरणी भागातील मुख्य रस्यावर भरविण्यात येणाऱ्या बाजारास मज्जाव करीत शेतकरी व व्यापाऱ्यांना पर्यायी जागेत स्थलांतरीत केले.
महापालिका हद्दीमध्ये मंगळवारचा आठवडी बाजार सद्यस्थितीत नवीन कौठा मुख्य रस्ता श्री साईबाबा मंदिर कमानीपासुन ते महात्मा बसवेश्वर पुतळ्यापर्यंत जाणाऱ्या मार्गावर भरत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असे. त्याचबरोबर रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांनाही अडचण निर्माण होत असल्यामुळे सदरील बाजार इतरत्र ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन होते. त्याअनुषंगाने आज मंगळवारी वसरणी भागातील साईबाबा मंदिराकडे जाणाऱ्या गॅस गोडाऊन कॉर्नरपासून ते वसरणी रोड दूध डेअरीपर्यंत रस्त्यावर बाजार स्थलांतरणाची कार्यवाही पार पाडण्यात आली.
सदरील कार्यवाही जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स.अजितपालसिंघ संधू यांच्या नेतृत्वात पालिकेच्या अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली. या कारवाईत नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हिंगोले त्यांचे पोलीस सहकारी अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे, गौतम कवडे, मिर्झा बेग, राजेश जाधव, निलावती डावरे यांच्यासह पालिकेचे १०० कर्मचारी तसेच ५० पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
वसरणी भागातील नवीन कौठा मुख्य रस्ता श्री साईबाबा मंदिर कमानीपासून ते महात्मा बसवेश्वर पुतळ्यापर्यंत या मार्गावरुन जाताना येथील बाजारामुळे वाहतुकीची होणारी कोंडी तसेच भरधाव वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी या आठवडी बाजाराचे स्थलांतर करणे आवश्यक होते. सदरील आठवडी बाजार स्थलांतरीत केल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांकडून समाधान व्यक्त केल्या जात आहे. तसेच यापुढेही व्यापारी व शेतकरी बांधवांनी मंगळवारचा आठवडी बाजार मुख्य मार्गावर न भरवता पालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या पर्यायी जागेत अर्थात साईबाबा मंदिराकडे जाणाऱ्या गॅस गोडाऊन कॉर्नरपासून ते वसरणी रोड दूध डेअरीपर्यंत रस्त्याच्या बाजुस भरविण्याचे आवाहन पालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.



