सांस्कृतिक

नांदेडमध्ये गझल नवाज भिमराव पांचाळे यांच्या सूरांनी दिवाळी पहाट गोड होणार..!

गोदाकाठी या वर्षीही सूरांची तीन दिवसीय मैफील, गझल संध्येचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर करणार

नांदेड :- एखादा संगीत महोत्सव, एखाद्या शहराची ओळख व्हावी व त्या ओळखीने एक तपपूर्ती करावी, असा दुग्धशर्करेचा योग यंदा नांदेडच्या संगीत प्रेमींसाठी आला आहे. गीत, गझल, सुरांची बंदीशी आणि दिवाळीच्या शुभेच्छांची सूरमयी पहाट अर्थात दिवाळी पहाट ३१ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर या कालावधीत बंदाघाट येथे गोदावरीच्या रम्य काठी नांदेड येथे होणार आहे. 

नांदेड जिल्ह्याच्या सांस्कृतिक महोत्सवांच्या परंपरेला, सर्वोच्च मानाचा उत्सव म्हणजे दिवाळी पहाट. गेली ११ वर्षांची अखंड परंपरा असलेला दिवाळी पहाट हा या वर्षी १२ वे वर्ष साजरे करीत आहे. शास्त्रीय संगीतासह, नाट्यगीत, सुगम संगीत, सिने संगीताची मेजवाणी नांदेडकरांना देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन, गुरुव्दारा सचखंड बोर्ड, नांदेड शहर महानगर पालिका व नागरी संस्कृती समिती यांच्या मार्फत करण्यात येतो.
३१ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात दिवाळी पहाट कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ०५.०० वाजता सचखंड गुरुव्दारा नांदेड येथील रागी जत्था यांच्या किर्तनाने होईल. सकाळी ०५.३० वा मुंबई येथील प्रसिध्द गायिका अमृता वर्तक व संच यांच्या कार्यक्रमाने होणार आहे. दि.३१ ऑक्टोबरच्या सायंकाळी पटियाला येथील शाम चौरसीया घराण्याचे ख्यातकीर्त गायक सतनिंन्दर सिंघ बोडल यांचे गुरु गोबिंद दरबार या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे.
 १ नोव्हेंबर रोजी सकाळी दिवाळी पहाट परंपरेप्रमाणे स्वंयवर प्रतिष्ठाण नांदेड यांची शास्त्रीय संगीतावर आधारीत प्रस्तुती स्वर संगम या कार्यक्रमाने होणार आहे. यात पंडित रशीदखां यांचे पट्टशिष्य नागेश आडगांवकर यांच्या गायनाचा कार्यक्रम प्रस्तुत होईल. लक्ष्मीपूजन असल्या कारणाने या वर्षी देखील सायंकाळी सादरीकरणास विराम ठेवण्यात आल्याचे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.
२ नोव्हेंबर रोजी सकाळी नांदेड येथील स्थानिक कलावंताचा नियोजीत कार्यक्रम “ ह्रदयसंगमचे ” आयोजन, पत्रकार विजय जोशी यांच्या प्रस्तुतीने होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना व निवेदन ऍडव्होकेट गजानन पिंपरखेडे यांचे असणार आहे. संगीत डॉ. प्रमोद देशपांडे, निर्मिती सहाय्य विजय बंडेवार, गायिका शर्वरी डोंगरे, चैती दिक्षित, अपुर्वा कुलकर्णी, शुभम कांबळे, नामदेव इंगळे, विजय जोशी यांचे सादरीकरण असणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना ही प्रसिध्द संगीतकार गायक ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या रचनांवर आधारीत आहे. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मराठी गजल नवाज भिमराव पांचाळे यांच्या सुश्राव्य गझलच्या कार्यक्रमाने होणार आहे. या गझल संध्येचे  निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर हे करणार आहेत.
आचारसंहितेच्या काळात होणा-या या कार्यक्रमामध्ये, स्विप उपक्रमांतर्गत श्रोत्यांना मोठ्या संख्येने मतदान करण्याबाबत प्रत्येक कार्यक्रमामध्ये आवाहन केले जाणार आहे. नागरिकांनी दिवाळी सणानिमित्त आयोजीत, दिवाळी पहाट या तीन दिवसीय महोत्सवास दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भरघोस प्रतिसाद द्यावा व आयोजीत कार्यक्रमांचा आनंद लुटावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या व संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

दिवाळी पहाट २०२४ हा या वर्षीचा महोत्सव ३१ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर या कालावधीत नियोजित आहे. यावर्षीच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण गझल नवाज भिमराव पांचाळे यांच्या गझल गायनाच्या कार्यक्रमांसह, रागी किर्तनाची परंपरा जगभर प्रसार करणारे पटीयाला घराण्याचे गायक सतनिंन्दर सिंघ बोडल यांच्यासह अमृता वर्तक व संच असणार आहे. पंडित रशीद खान यांचे पट्टशिष्य नागेश आडगांवकर यांच्या सुरेल मैफलीचा आस्वाद घेता येणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिवाळी पहाट आयोजनाच्या वेळोवेळी बैठका घेत नियोजनाचे निर्देश दिले. त्यास प्रतिसाद देत नियोजन समितीने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!