प्रशासकीय

नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित, पूरग्रस्तांच्या खात्यात आतापर्यंत ४५३ कोटी २२ लाख रुपये जमा 

बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटपात नांदेड राज्यात अव्वल, ८२ टक्के अनुदान थेट खात्यात, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती

नांदेड – नांदेड जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत विशेषतः माहे ऑगस्ट २०२५ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पूर झाल्याने जीवित व वित्तहानी झाली होती. अशा बाधितांना वेळोवेळी तातडीने जिल्हा प्रशासनातर्फे मदत दिली जात आहे. आतापर्यंत ४५३ कोटी २२ लाख रुपये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी पध्दतीने जमा होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. अनुदान वाटपात नांदेड जिल्हा राज्यात अव्वल आहे. जिल्ह्याच्या या कामगिरीचे राज्याच्या मुख्य सचिवांनी कौतुक केले आहे.

नांदेड जिल्ह्यात माहे जून ते सप्टेबर २०२५ मध्ये ९ लाख ३५ हजार ७०३ शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेत जमिनीचे नुकसान झाले. त्या अनुषंगाने शासनाकडून ६४९ कोटी ८१ लाख मंजूर रक्कम बाधित शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ६ लाख १३ हजार ९९३ इतक्या शेतकऱ्यांना ४५९ कोटी ९९ लाख रुपयांची मदत वाटप करण्यासाठीची माहिती ऑनलाईन प्रणालीवर तहसील कार्यालयातून भरण्यात आली आहे. सदर कार्यवाही ७०.७२ टक्के पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदतीची रक्कम डीबीटी पध्दतीने जमा होत आहे. विशेषतः जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या माहे ऑगस्ट २०२५ मधील ८२ टक्के शेतकऱ्यांची माहिती ऑनलाईन प्रणालीवर भरण्यात आली आहे. त्यासाठी ४५३ कोटी २२ लाख रुपये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी पध्दतीने जमा होत आहे.

जिल्ह्यात माहे जून ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विज पडून, पुरात वाहून व इतर कारणाने एकूण ३६ व्यक्ती मयत झाले असुन त्यापैकी ३९ प्रकरणात वारसांना प्रत्येकी ४ लाखाप्रमाणे १ कोटी २४ लाख इतकी मदत वितरीत करण्यात आली आहे. उर्वरीत ५ प्रकरणात कागदपत्रांची पूर्तता होताच मदत वितरीत करण्यात येणार आहे. तसेच नांदेड जिल्ह्यात माहे जून ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विज पडून, पुरात वाहून व इतर कारणाने मयत जनावरांची एकूण ६७३ पात्र प्रकरणे आहेत. त्यापैकी ६१९ प्रकरणात रुपये १ कोटी ६९ लाख इतकी मदत वितरीत करण्यात आलेली आहे. उर्वरीत प्रकरणात कार्यवाही सुरु आहे. याच कालाधीत जिल्ह्यातील एकूण २६ हजार २७६ कुटुंबांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले होते. अशा बाधित कुटुंबांपैकी २४ हजार ९७ कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयांप्रमाणे २४ कोटी ९ लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत. उर्वरीत प्रकरणात कार्यवाही सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी यांनी त्यांचे ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी काढून घ्यावेत तसेच केवायसी पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी केले आहे.

मुदखेड येथे तहसीलदारांचे वाहन फोडल्याचा प्रकार २७ ऑक्टोबर रोजी अंदाजे १ वाजेच्या सुमारास घडला होता. मुदखेड तालुक्यातील वासरी येथील साईनाथ मारोती खानसोळे या व्यक्तीने पिक नुकसान अनुदान जमा झाले नसल्याने मुदखेड तहसीलदार यांचे शासकीय गाडीचा समोरील काच फोडून आरडाओरड केली. साईनाथ खानसोळे व्यक्तीचे मौ. वासरी गावातील गट क्र. ३७९ व ३८२ मधील पिक नुकसानीचे अनुदान रुपये ६ हजार २९० रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये ८ ऑक्टोबर २०२५ रोजी रोजी जमा झाले आहेत. विशेष म्हणजे साईनाथ खानसोळे या व्यक्तीला २०२३ मध्ये ८ हजार ५००, ५ हजार १०० आणि १ हजार ७८५ रुपये तसेच २०२४ मध्ये १० हजार ८८० आणि २०२५ मध्ये ६ हजार २९० रुपये असे सलग तीन वर्षे अनुदान मिळाले आहे. मुदखेड तहसीलदाराची गाडी फोडल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!