
नांदेड – नांदेड लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन शासकीय तंत्रनिकेतन येथील स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेतील या स्ट्रॉंग रूमची १३ मे रोजी नांदेड लोकसभा मतदार संघातील रिंगणात असलेल्या २३ पैकी चार उमेदवारांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या अविनाश भोसीकर यांचाही समावेश होता.
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उमेदवारांच्या शंका निरसनासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १३ मे रोजी सायंकाळी सहा वाजता रिंगणातील सर्व उमेदवार किंवा त्यांचे अधिकृतरित्या नियुक्त प्रतिनिधी यांनी स्ट्रॉंग रूम येथे उपस्थित राहण्यास कळवले होते. यावेळी कार्यालयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पाहण्याची सूचना केली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळी काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांचे प्रतिनिधी एकनाथ मोरे, देश जनहित पार्टीचे उमेदवार अब्दुल रईस अहमद, अपक्ष उमेदवार नागेश संभाजी गायकवाड, बहुजन भारत पार्टीचे उमेदवार हरी पिराजी बोयाळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर आणि त्यांचे प्रतिनिधी महेंद्र देमगुंडे यांनी स्ट्रॉंग रूमला भेट देऊन एकूण सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेतली. या सुरक्षा व्यवस्थेतील महत्त्वाची बाब असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजचीही उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी पाहणी केली. २७ एप्रिल पासूनचे फुटेज उमेदवारांना दाखवण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक ती माहिती उमेदवारांना देण्यात आली आहे. २७ एप्रिल रोजी उमेदवार त्यांचे प्रतिनिधी तसेच निवडणूक निरीक्षकांच्या जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूम सील करण्यात आली आहे.
आगामी काळातही सर्व उमेदवार स्वतः किंवा त्यांचे प्रतिनिधी यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून पास घेऊन स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी उपस्थित राहावे असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळवले आहे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
स्ट्रॉंग रूम परिसरात काँग्रेसने मांडले ठाण…लोकसभा निवडणुकीत २६ एप्रिल रोजी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडले. यानंतर २७ एप्रिल रोजी स्ट्रॉंग रूम सील केल्यानंतर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी निवडणूक रिंगणातील सर्व उमेदवारांना शासकीय तंत्रनिकेतन येथील मतदान यंत्र सुरक्षा केंद्रावर उभारण्यात आलेल्या पेंडॉलमध्ये बसण्यासाठी प्रतिनिधी नियुक्त करण्याबाबत कळवले आहे. त्यानुसार निवडणूक रिंगणातील २३ उमेदवारांपैकी काँग्रेसचे उमेदवार प्रतिनिधी एकनाथ मोरे यांनी सुरक्षा केंद्रावरील पेंडॉलमध्ये ठाण मांडले आहे. इतर उमेदवारांनी मात्र येथे थांबण्यासाठी अद्यापही तरी अनुमती मिळवली नाही.
सर्व उमेदवारांना स्ट्रॉंग रूम ॲक्सेस …नांदेड येथील स्ट्रॉंग रूममध्ये २७ एप्रिल रोजी मध्यरात्री मतदान यंत्र जमा केलेल्या रूममधील सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले, नांदेड लोकसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांना स्ट्रॉंग रूमचा इंटरनेट ॲक्सेस देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांना कोणत्याही क्षणी स्ट्रॉंग रूममधील परिस्थिती आहे त्या ठिकाणावरून पाहता येणार आहे. त्यामुळे असे आरोप हे तथ्यहीन असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले.