
नांदेड – नीट परीक्षेमध्ये गुजरातमधील गोधरा, बिहार आदी ठिकाणी झालेल्या घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुन्हा एकदा घ्यावी या मागणीसाठी नांदेडमध्ये युवक काँग्रेस, पीटीए संघटना व सीसीटीएफ संघटना यांच्या वतीने नांदेड शहरातील भाग्यनगर ते महात्मा फुले पुतळ्यापर्यंत विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात भव्य मोर्चा काढण्यात आला.
नीट या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत देशभरात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. विद्यार्थ्यांना १८० मार्कांपर्यंत ग्रेस मार्क देण्यात आलेले आहेत. तसेच या वर्षी सर्वोच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपैकी ७५ टक्के विद्यार्थ्यांना अशा प्रकारे ग्रेस मार्क देऊन गुणांचा फुगवटा करुन देण्यात आलेले गुणवत्ताधारक आहेत. सर्वप्रथम बिहार येथील पाटणा शहरात तेथील परीक्षेशी संबंधित काही लोकांना पेपरफुटीसंबंधी अटक करण्यात आली होती. परंतु आता एनटीए म्हणते आहे की पेपरफुटी झालेलीच नाही. तर मग या लोकांना कशाच्या आधारावर अटक केली याचा काहीही खुलासा एनटीएने केलेला नाही. या घोटाळ्यामुळे देशभरातील विविध प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांची निराशा झालेली आहे. सर्वसामान्यांच्या पोरांनी मेहनत घेऊन वर्ष वर्ष अभ्यास करायचा, त्यांच्या शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब मायबापांनी कष्ट करुन, पोटाला चिमटा घेऊन कमावलेला पैसा पोरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रचंड प्रमाणात पाण्यासारखा खर्च करायचा. आणि ऐनवेळी पैसेवाल्या धनाढ्य लोकांच्या पोरांनी आयत्या बिळावर नागोबा म्हणत पैशांच्या ताकदीवर घोटाळे करुन, एनटीएसारख्या संस्था “मॅनेज” करुन गोरगरीबांच्या हक्कांवर डल्ला मारायचा यातून सर्वसामान्य विद्यार्थी आमच्या मेहनतीला काहीही अर्थ नाही असा समज करवून घेऊन ते निराशावादी बनून निष्क्रीय बनण्याची शक्यता कदापि नजरेआड करता येत नाही. यासाठीच नीट ही वैद्यकीय प्रवेश परिक्षा देशपातळीवर पुन्हा एकदा नव्याने निष्पक्षपाती पद्धतीने घेण्यात यावी, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीत एसआयटीचे गठन करुन सदरील घोटाळ्याची चौकशी करावी, सध्यस्थितीत ही परीक्षा NTA (NATIONAL TESTING AGENCY) द्वारे घेण्यात येते, परंतू २००८ पूर्वी ती CBSE (CENTRAL BOARD OF SECONDERY EDUCATION) द्वारे घेण्यात यायची. तेव्हा ती विश्वासार्ह पद्धतीने घेतली जायची. आता एनटीए अंतर्गत घोटाळा झाल्यामुळे विद्यार्थ्यांची एनटीए वरील विश्वासार्हता भंग झालेली आहे. म्हणून इथून पुढे परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पडण्यासाठी सीबीएसई द्वारेच परीक्षा घेण्यात यावी, सदरील घोटाळ्याची सीबीआय मार्फत चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागण्यांना घेऊन विद्यार्थ्यांचा एल्गार मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा १४ जून रोजी शहरातील भाग्यनगर कमान येथून सुरु झाला. हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत यशवंत महाविद्यालयासमोरुन शंकरराव चव्हाण स्मृतीला वळसा घालून महात्मा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आला. यावेळी विविध विद्यार्थी, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी यांनी भाषणे केली. तसेच भारतीय युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे यांनी समारोपीय भाषण केले. यानंतर शिष्टमंडळाने वरील मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिले. या मोर्चास आर. बी. जाधव, राज आटकोरे, नागेश कल्याणकर, कॉन्ग्रेस पक्षाचे केदार साळुंखे, विश्वास कदम, महेश देशमुख, निरंजन पावडे, संदीप गौड, दिगांबर पा. तिडके, केतन देशमुख, प्रशांत पाटील मुंगल, शिवम मगरे, भास्कर कळणे, ज्ञानेश्वर मगरे, शरद पवार, महेश पवार, साहिल शेख, तिरुपती मगरे, युवा सेनेचे संभाजी गाडे, बापूजी गाडे तसेच हजारो विद्यार्थी, पालक उपस्थित होते.