
नांदेड – नांदेड जिल्ह्यात १० फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होत आहे. ४२ हजार ८७२ विद्यार्थी इयत्ता बारावीची परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यातील ११२ केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बारावीच्या पहिल्या इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान जिल्ह्यातील सर्व केंद्रावर वेब कास्टिंगद्वारे नजर ठेवली जाणार आहे. कोणत्याही केंद्रावर कॉपी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला आहे.
परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी १० विशेष भरारी पथके तसेच प्रत्येक केंद्रावर एक बैठे पथक कार्यान्वित राहणार आहे. सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही राहणार आहेत. जिल्ह्यात असलेल्या ३० संवेदनशील परीक्षा केंद्रावर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी दिली. परीक्षेच्या पारदर्शक व सुरळीत आयोजनासाठी झूम सुविधेद्वारे निरीक्षण केले जाणार आहे. इंग्रजी विषयाच्या पहिल्या पेपरदरम्यान वेब कास्टिंग केले जाणार आहे. यासाठी दोन नियंत्रण कक्ष, कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आले आहेत. सर्व परीक्षा केंद्रे सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात आली आहेत. परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गोंधळ, कॉपी किंवा अन्य गैरप्रकार आढळून आल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा तणाव अथवा भीती न बाळगता निर्भय वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. परीक्षेदरम्यान १०० टक्के कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील महसूल विभागाचे सर्व विभाग प्रमुख, जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख, उपविभागीय अधिकारी, तालुका स्तरावर तहसिलदार व गटविकास अधिकारी यांची भरारी पथके असून शिक्षण विभागाचे सहा पथके सदर परीक्षेवर करडी नजर ठेवणार आहेत. तसेच स्वत: जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षकही परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत.



