
देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशभरातल्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी जबाबदार, हुशार, आणि कुशल नागरिक तयार करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकला. शिक्षण हे फक्त नोकरी नसून जीवनपद्धती आहे, शिक्षकांमध्ये राष्ट्र घडवण्याची आणि जीवन परिवर्तन करण्याची ताकद असल्याचं त्यांनी नमूद केलं. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण नवी दिल्लीत आज शुक्रवारी राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. राज्यातल्या तीन शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला. यामध्ये नांदेडचे डॉ. शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदोद्दीन, लातूरचे डॉ. संदीपान जगदाळे आणि मुंबईतल्या सोनिया कपूर यांचा समावेश आहे.
दरम्यान, राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक डॉ. शेख मोहम्मद वकीउद्दीन यांनी या पुरस्काराचे श्रेय संपूर्ण जिल्हावासिय, त्यांच्या शाळेतील विद्यार्थी आणि पालकांना असल्याचे सांगितले. शैक्षणिक क्षेत्रात सुधारण्याचा आपला छोटासा हा प्रयत्न होता. यापुढेही असे उपक्रम आपण सातत्याने सुरूच ठेवू.यात समाजाचीही मोठी साथ आपल्याला मिळाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्याध्यापक डॉ. शेख मोहम्मद वकीउद्दीन यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संपूर्ण जिल्हाभरातून त्यांचे कौतुक होत आहे.



