शैक्षणिक

अभियांत्रिकी प्रवेशासाठी नांदेडमध्ये २६ जून रोजी बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी स्कूल कनेक्ट मार्गदर्शन कार्यशाळा

एसजीजीएस अभियांत्रिकी कॉलेजच्या वतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत अभियांत्रिकीतील विविध संधीची माहिती देण्यात येणार

नांदेड – विष्णुपुरी येथील श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी तर्फे १२ वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी स्कूल कनेक्ट (NEP कनेक्ट)-२०२४ या कार्यक्रमाचे २६ जून रोजी  सकाळी ११.०० वाजता नांदेड शहरातील कुसुम सभागृह, व्ही.आय.पी. रोड येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिजित राऊत,  औरंगाबाद विभागीय कार्यालयाचे उच्च व तंत्र शिक्षण  सह-संचालक, उमेश नागदेवे, श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे सहसंचालक डॉ. मनेश कोकरे आदी यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमा अंतर्गत १२ वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी मार्गदर्शन करणे हे या एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. अभियांत्रिकी शिक्षणातील विविध संधीची कल्पना आणि वेगाने होत असलेल्या बदलांचा विद्यार्थ्यांना फायदा होऊन त्यांचे भविष्य कसे उज्वल होईल या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अभ्यासक्रमामध्ये असलेल्या विविध संधीबद्दलची माहिती विद्यार्थी आणि पालकांना देण्यात येणार आहे.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावरील सविस्तर माहिती तसेच तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिनस्त असलेले विविध पदवी अभ्यासक्रम, त्यांना प्रवेश घेतांना लागणारी पात्रता, प्रवेश नीयमावली, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, अर्ज भरण्याची प्रक्रिया, प्रक्रियेचा साधारण कालावधी, त्यासाठी लागणारी कागदपत्रे इत्यादीची माहिती देण्यात येणार आहे. याला अनुसरून प्रवेश अर्ज भरल्यानंतर अर्ज निश्चिती करणे, गुणवत्ता यादी मधील त्रुटी दुरुस्त करणे, अंतिम गुणवत्ता यादी तपासणे, विकल्प सादर करणे, कॅप जागावाटप, जागास्वीकृती करणे, जागावाटप केलेल्या संस्थेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे इत्यादी पदवी प्रवेश प्रक्रियेशी संबंधीत बाबींची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येईल. यासोबतच शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्त्या विषयी माहिती देऊन अभियांत्रिकी शिक्षण कमी खर्चात पूर्ण करून रोजगारक्षम तसेच उद्यमशील उद्योजक कसे बनता येईल आणि Placement संबंधी विस्तृत माहिती विद्यार्थी व पालकांना देण्यात येईल.

अभियांत्रिकी प्रवेश इच्छुक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये योग्य अभ्यासक्रमाची निवड, उपलब्ध रोजगार व नविन उद्योग सुरु करण्याच्या संधी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, या विषयी जागरूकता निर्माण करणे हा स्कूल कनेक्ट कार्यक्रमाचा उद्देश आहे. हा कार्यक्रम पूर्णतः निशुल्क असुन या संस्थेच्या व प्रशासकीय मंडळाच्या वतीने विद्यार्थी व पालकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!