महापालिका

नांदेड महापालिकेत वर्षानुवर्ष एकाच टेबलावर ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांना हलवले

कमी करवसुली करणाऱ्या लिपिकांचेही बदलले झोन, आयुक्त तथा प्रशासकांनी पहिल्यांदाच उगारला बदलीचा हंटर

नांदेड – महापालिकेत वर्षानुवर्षे एकाच टेबलवर ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना हलवण्याचे धाडस आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दाखवले आहे. अशा तब्बल एकूण १३ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सामाजिक न्याय दिनी आयुक्तांनी काढले आहेत. दुसरीकडे ज्या कर वसुली लिपिकांचे कर वसुलीचे प्रमाण नगण्य आहे अशा १९ कर वसुली लिपिकांनाही झोन बदलून देण्यात आले आहेत. त्यामुळे आयुक्तांनी पहिल्यांदाच हा ‘बदल्यांचा हंटर’ महापालिकेत उगारल्याने कर्मचारी आता सतर्क झाले आहेत.

नांदेड महापालिकेत सध्या प्रशासकीय राज सुरू आहे. जवळपास दोन वर्षापासून महापालिकेवर प्रशासक आहेत. विद्यमान आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या एक वर्षाच्या कार्यकाळात आर्थिक आणीबाणीशी झगडत महापालिकेचा कारभार कसा करायचा, यातच त्यांची वर्षपूर्ती झाली आहे. एकीकडे शासनस्तरावरून मिळणारे अनुदान थांबले आहे तर दुसरीकडे कर वसुलीचे प्रमाणही अपेक्षेप्रमाणे वाढले नाही.  कर वसुलीच्या प्रयत्नांना कर वसुली लिपीकाकडून अपेक्षित साथ मिळत नसल्याने त्यांचा झोन बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २६ जून रोजी या बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. दुसरीकडे एकाच टेबलावर आणि एकाच झोनमध्ये वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आयुक्तांकडे येत होत्या. या कर्मचाऱ्यांवरही आयुक्तांची नजर होतीच. दुसरीकडे मुख्यालयातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारेही अशा कर्मचाऱ्यांना शोधण्यात आले. वर्षानुवर्ष एकाच टेबलावर ठाण मांडून बसलेल्या १३ कर्मचाऱ्यांच्या शोध घेऊन त्यांच्याही बदल्या करण्यात आले आहेत. जवळपास १० ते तब्बल ३१ वर्ष एकाच ठिकाणी सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता आपले झोन, विभाग सोडावे लागणार आहेत. त्यामध्ये जकात जवान रंगनाथ भोसले, लिपिक संजय नागापूरकर, जकात जवान गजानन टाक, लिपिक रमेश हांडे, चौकीदार मेघराज जोंधळे, पुरुष मजूर महेंद्र पठाडे, लिपिक राजेश एडके, पुरुष मजूर ईश्वर वाव्हळ, मजूर स. गफार स. मिया, पुरुष मजूर संतोष भदरगे, मारुती चव्हाण, लिपिक सुधीरसिंह बस आणि दीपक पाटील यांचा समावेश आहे.

मनपाचा आर्थिक डोलारा सध्या कर वसुलीवरच सुरू आहे. त्यामुळे कर वसुलीकडे आयुक्तांचे विशेष लक्ष आहे. या कर वसुलीत कमी पडणाऱ्या अनिल चौधरी, जगन्नाथ पारदे, धम्मरत्न दवणे, मारुती रणखांबे, उत्तम जोंधळे, सतीश जुजाराव, पवन पावडे, सुभाष ढाकणे, गणेश बुंदेले, पंडित खूपसे, महेंद्र नागरे, व्यंकट गायकवाड, नारायण आठवले, शेख रफिक, सुनील नंदननवरे, सुरेंद्र जोंधळे, सुखदेव जोंधळे, संदीप धोंगडे, संजय ढेगळे, सुशांत दवणे, संदीप गच्चे, सत्यनारायण कापसे, गंगाधर जाधव, राजू सोनकांबळे, गजानन सोनटक्के, पांडुरंग खरोडे, विशाल शिंगे, प्रवीणकुमार धुमाळे, प्रमोद पोहळकर, आशीर्वाद चव्हाण, बबन लोखंडे, मो.अजीजी मो.रफिक, रिजवान मौला शेख, साहेबराव जोंधळे, वैभव नरवाडे, विवेकानंद लोखंडे, अशोक भंडारे आणि बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे. या सर्वांचे झोन बदलण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशाची त्वरित अंमलबजावणी व्हावी संबंधितांनी तात्काळ रुजू व्हावे असे निर्देश देण्यात आले आहेत. रुजू न झाल्यास कारवाईचा इशाराही आयुक्त डॉ. महेशकुमार यांनी दिला आहे.

तीन महिन्यात दहा कोटींची कर वसुली… नांदेड महापालिकेला २८७ कोटींची कर वसुली करावयाची आहे. यामध्ये थकीत कराचा मोठा वाटा आहे. कर वसुलीचा हा डोंगर पार करण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. चालू आर्थिक वर्षात नांदेड महापालिकेने एप्रिल २०२४ ते जून २०२४ या तीन महिन्याच्या कार्यकाळात दहा कोटींची कर वसुली केली आहे. शहरात असलेल्या जवळपास १ लाख २५ हजार मालमत्तांपैकी १२ हजार मालमत्ताधारकांनी आपला चालू वर्षाचा कर भरला आहे. महापालिकेने मालमत्ता धारकांसाठी विविध सूट योजना घोषित केल्या आहेत.  त्याचा लाभ शहरवासीयांनी घेतला आहे. या सूट योजनांमध्ये मालमत्ता करावरील थकबाकी शास्तीत आणि विशेष पाणीपट्टी करावरील थकबाकी शास्तीत ६० टक्के सूट देण्यात आली आहे. ही सूट योजना ३० जूनपर्यंत लागू राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!