
नांदेड – लोकसभा निवडणुकीतील समीकरण वेगळे असते आणि विधानसभेचे समीकरण वेगळे असते. लोकसभेला असलेला ट्रेंड विधानसभेला कायम राहील असे नसते. एकच मतदार असतो परंतु तो लोकसभा आणि विधानसभेला स्वतंत्र विचार करणारा असतो, अशी टिप्पणी हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिथे सांगितले तिथे निवडणुकीला उभे राहण्यास आपण तयार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नांदेडमध्ये ते शुक्रवारी काही पत्रकारांशी संवाद साधत होते.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. महाराष्ट्रात तर हे यश अगदी उठून दिसत आहे. असे असतानाही शिवसेनेचे माजी खासदार राहिलेले सुभाष वानखेडे यांनी मात्र प्रत्येक निवडणुकीत एकच ट्रेंड राहत नाही असा दावा केला आहे. लोकसभेचे आणि विधानसभेचे समीकरण वेगवेगळे असते. मतदार एकच असला तरीही तो या दोन्ही निवडणुकीत स्वतंत्र निर्णय घेत असतो असेही वानखेडे म्हणाले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जे यश प्राप्त झाले आहे, ते आगामी काळातील विधानसभा निवडणुकीत प्राप्त होईल का नाही याबाबत खासदार वानखेडे यांना शंका आहे की काय असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
आपण आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी तयार आहोत. पक्षप्रमुखांनी जिथे आदेश दिला तेथे निवडणूक लढवू असेही ते म्हणाले. हदगाव विधानसभेसाठी आपण इच्छुक आहोत. आता येथे विद्यमान आमदार हे काँग्रेसचे आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनीही नुकताच प्रवेश केला आहे. त्यामुळे येथे उमेदवारीचा तिढा निर्माण होणार आहे. मात्र पक्ष जो निर्णय घेईल, त्यास आपण बांधील राहू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आगामी काळात महाविकास आघाडीत जागा वाटपावरून तिढा निर्माण होईल का असे विचारले असता प्रत्येकाला समसमान जागा हे धोरण राहणार नाही. ज्याची ताकद जास्त तिथे त्या पक्षाला जागा या धोरणानुसार जागावाटप होईल असे ते म्हणाले. राज्यात २८८ जागा आहेत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात जागा वाटपातून कोणताही तिढा राहणार नाही असे ते म्हणाले. शिवसेनेने नांदेडमध्ये हदगाव, नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, भोकर, कंधार-लोहा तसेच मुखेड विधानसभेतही दावेदारी सांगितली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात स्पर्धा आहे. ही स्पर्धा असणे चांगले लक्षण असल्याचे ते म्हणाले. इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केलीच पाहिजे. परंतु शेवटी पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील, जो निर्णय घेतील तो अंतिम राहील असेही ते म्हणाले.
विधानसभा निवडणूक आपण जनतेच्या हितासाठी लढवणार असल्याचे म्हणाले. सध्या लोकप्रतिनिधींचे हेतू बदलले आहेत. आता स्वतःचा विकास करण्यास लोकप्रतिनिधी प्राधान्य देत आहेत. निवडून आल्यानंतर ते काही दिवसातच असते करोडपती होत आहेत. असा अचानक काय घडत आहे ज्यातून या लोकप्रतिनिधी संपत्ती इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आपण मात्र विधानसभा निवडणूक ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अवैध धंद्यावरही त्यांनी भाष्य केले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याची चलती आहे. जिल्ह्यात सर्वत्र मटका, दारू, जुगार सर्रासपणे सुरू आहे. किराणा दुकानावरही दारू मिळत आहे. व्यसनाधीनतेमुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. याकडे आता लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभेची उमेदवारी नाकारली..! विधानसभेसाठी पक्षप्रमुखांनी दिला आहे शब्द…नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी देण्याबाबत पक्षाकडून विचारणा करण्यात आली होती. मात्र आपण लोकसभेची उमेदवारी नाकारली असल्याचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी म्हटले आहे. विधानसभेसाठी आपल्याला पक्षप्रमुखांनी शब्द दिला आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षप्रमुख जो निर्णय उमेदवारीबाबत घेतील तो आपल्याला मान्य राहणार आहे. लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघात काही लोकांनी काम केले नसल्याचा आरोप नूतन खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केला आहे. यावर वानखेडे यांनी प्रतिक्रिया देताना कोण काम केले, कोण काम केले ही बाब आता गौण असली तरीही यांनी काम केले नाही, त्यांनी काम केले नाही तर मग जागा कशी आली असा उलट प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे एकूणच आता हिंगोली लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघणारे असेल, असेच चित्र आहे.