Police

नांदेड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हा शाखेने पकडली आंतरराज्यीय टोळी 

नांदेड शहरासह तेलंगणा राज्यातही घातला होता धुमाकूळ, चार पिस्तूल जप्त, महिलांच्या गळ्यातील दागिनेही होते हिसकावले

नांदेड – नांदेड शहरासह भोकर, वसमत आणि तेलंगणा राज्यात चोरीच्या मोटारसायकल आणि पिस्तूल वापरून घरफोडी, दुचाकी तसेच महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद केले आहे. या टोळीतील सात जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून वेगवेगळ्या घटनेतील ६ लाख ८९ हजार ६९७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

नांदेड शहरातील भाग्यनगर, विमानतळ, शिवाजीनगर पोलीस ठाणे सोबतच भोकर, वसमत आणि तेलंगणा राज्यातील मुधोळ, बासर, तनूर आणि बोधन येथील ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल असलेल्या वेगवेगळ्या प्रकरणांच्या तपासात जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हा शाखेने सायबर पोलिसांच्या मदतीने तपास केला. ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या टीमने हे गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड, महेश कोरे यांच्यासह त्यांच्या पथकातील अंमलदार ७ जुलै रोजी पथकासह तपासासाठी रवाना झाले. ते आसना पुलावर पोहोचले. त्यावेळी गुप्त माहिती मिळाली की काहीजण हे अवेन्यू सिटी, आसना येथे रस्त्यावर गावठी कट्टे घेऊन बसले आहेत. या माहितीवरून सदर पथकाने तेथे जाऊन छापा टाकला. तेथे शेख मोबीन शेख गौस रा. खुदबेनगर, संजय उर्फ संजू दत्ता गुंडेवार रा. नंदीग्राम सोसायटी आणि रोहित नरेंद्र ताटीपामुलवार रा. भावेश्वरनगर चौफाळा नांदेड हे तिघेजण सापडले. त्यांच्याकडून तीन गावठी कट्टे आणि चार जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांचे काही मित्र शिवरोड तरोडा येथे चोरीचा माल व अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी थांबलेले असल्याचे कळले. त्या ठिकाणीही पथकाने छापा मारला तेथे अमन उर्फ अमण्या किशोर जोगदंड रा. खोब्रागडे नगर नांदेड, राहुल उर्फ हिपहाप माणिका लिंगायत रा. भोकर जि. प. शाळेच्या मागे आणि मोहम्मद आफताब उर्फ अदु अब्दुल खादिर रा. दिवाणी बावडी इतवारा हल्ली मुक्काम मुदखेड हे आढळले. त्यांच्या ताब्यातूही एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतूस, एक मॅक्झिन, ६.४ तोळ्याचे सोन्याचे दागिने, दोन मोटारसायकली आणि रोख ५ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले. या घटनेतील आरोपी अमन याचा मित्र आणि चोरीचा माल घेतलेला राहुल उर्फ बाब्या चंद्रकांत राव रा. आंबेडकर नगर, भोकर यालाही ताब्यात घेतले असून त्याच्याकडून गुन्ह्यातील नगदी १० हजार रुपये आणि मुथूट फायनान्स येथे ठेवलेले सोन्याचे गंठण जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी महिलांचे दागिने हिसकावणे, घरपोडी आणि मोटारसायकल चोरी केलेला मुद्देमाल तसेच चार गावठी पिस्तूल, एक मॅक्झिन आणि सात जिवंत काडतूस असा एकूण ६ लाख ८९ हजार ६९७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी यावेळी स्थानिक गुन्हा शाखेच्या या पथकाचे कौतुक केले. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सायबर शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाण, स्थानिक गुन्हा शाखेचे पोहेकॉ मोहन हाके, दारासिंग राठोड, मिलिंद नरबाग, बालाजी कदम, पोकॉ राजू डोंगरे, महेश बडगु, इमरान शेख, प्रमोद जोंधळे, संदीप घोगरे, रितेश कुलथे, श्रीराम दासरे, माने, उमर शेख, अमोल घेवारे, पोहेकॉ राजू सिटीकर आणि दीपक ओढणे यांचा समावेश होता.

पोलिसांनी पकडलेल्या आरोपीमध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकवण्यामध्ये अमन उर्फ अमण्या किशोर जोगदंड वय २१, रा. खोब्रागडे नगर नांदेड, राहुल उर्फ हिपहाप मानिका लिंगायत वय २३, रा. जिल्हा परिषद शाळेच्या मागे भोकर, मोहम्मद आफता ब उर्फ अदु अब्दुल खादिर वय २१, रा. दिवाणी बावडी इतवारा हल्ली मुक्काम मुदखेड हे तिघेजण समाविष्ट आहेत. पोलिसांनी शेख मोबीन शेख गौस वय २५ रा. खुदबेनगर नांदेड, संजय उर्फ संजू दत्ता गुंडेवार वय ३० रा. नंदीग्राम सोसायटी नांदेड आणि रोहित नरेंद्र ताटीपामुलवार वय २१ रा. भावेश्वरनगर चौफळा नांदेड या तिघांकडून गावठी कट्टे जप्त केले आहेत तर चोरीचा माल विकत घेणाऱ्यामध्ये राहुल चंद्रकांत राव वय २५, रा. आंबेडकरनगर भोकर याचा समावेश आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!