
नांदेड – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात ७० हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. या योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी आता शासनाने अधिक सुलभता आणली आहे. उत्पन्नाच्या प्रमाणपत्राऐवजी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तसेच रहिवासी प्रमाणपत्र ऐवजी आता शाळा सोडल्याचा दाखला मतदान कार्ड ग्राह्य धरले जात आहेत.
या योजनेअंतर्गत ऑनलाइनसोबत आता ऑफलाईन अर्ज ही घेतले जात आहेत. गावोगाव अर्ज भरून घेण्यासाठी कॅम्प घेतले जात आहेत. महापालिकेअंतर्गतही अर्ज भरून घेण्यासाठी मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. नागरिक स्वतःही आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात. संध्याकाळी हा अर्ज भरणे अधिक सुलभ होईल.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अर्धापूर तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन या योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कॅम्पची पाहणी केली. नांदेड महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे हे शहरातील वार्डावार्डात तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल याही जिल्ह्यात देगलूरपासून ते किनवटपर्यंत या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जात आहेत. कुठल्याही प्रकारे कुठल्याही आमिषाला, प्रलोभनाला बळी पडता किंवा कोणीतरी आपल्याकडे मध्यस्त म्हणून सांगत असेल की, मी तुमचा फॉर्म भरून घेतो आणि मला काही पैसे द्या. त्या अमिषाला आपण टाळायचे आहे. याबाबत आपण तक्रार केली पाहिजे. शासकीय यंत्रणा हे आपल्यापर्यंत येऊन निश्चितपणे १०० टक्के सगळ्या पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेतले जातील, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला आहे.