नांदेड – नवीन नांदेडातील गोपाळचावडी भागात असलेल्या पावर हाऊस परिसरात एक बिबट्याचे पिल्लू असल्याच्या भितीने स्थानिक नागरिकांची गाळण उडाली होती. मात्र वनविभागाच्या पथकाने सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पावर हाऊस परिसरात भेट देऊन पाहणी केली असता ते केवळ एक रानमांजर असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती उप वनसंरक्षक केशव वाबळे यांनी दिली.
गोपाळचावडी परिसरातील पावर हाऊस परिसरात एक बिबट्याचे पिल्लू फिरत असल्याचा व्हिडिओ रविवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या बाबीची अनेकांनी वनविभागालाही माहिती दिली. वनविभागाने सोमवारी सकाळीच एक पथक पाठवून या बाबीची शहानिशा केली. वनविभागाच्या पथकाने परिसरातील पाऊल खुणावरून ती प्राणी बिबट्याचे पिल्लू नसून ते रानमांजर असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन उपवनसंरक्षक वाबळे यांनी केले आहे. याउपरही खबरदारी म्हणून वनविभागाच्या वतीने पावर हाऊस परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यातून आणखी माहिती घेऊन स्पष्टता येईल असे त्यांनी सांगितले. वनविभागाच्या या खुलाशानंतर स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि: श्वास सोडला आहे.
याबाबत उपवनसंरक्षक केशव वाबळे म्हणाले, गोपाळचावडी येथील पावर हाऊसला चारही बाजूने कंपाउंड वॉल आहे. त्याचवेळी त्या कंपाउंड वॉलवर तार फिनिशिंगही करण्यात आली आहे. त्यामुळे इतक्या उंचावरून बिबट्या अथवा इतर प्राणी आत येणे शक्य नाही. परिसरात बिबट्या असेल तर तो प्राण्यांची शिकार करतो. त्यामध्ये शेळ्या, गाई अथवा कुत्र्यांचीही तो शिकार करतो. त्यामुळे असा कोणताही प्रकार या भागात घडला नाही. वनविभागाच्या पथकाने सोमवारी केलेल्या स्थळपाहणीत आढळलेल्या पाऊलखुणा या रानमांजराच्या आहेत. त्यामुळे येथे कोणताही बिबट्या अथवा इतर हिंस्र प्राणी नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. आपले दैनंदिन व्यवहार नियमित ठेवावेत, असे आवाहनही वाबळे यांनी केले आहे.