नांदेड – नुसते आगे बढो हम तुम्हारे साथ है… म्हणून चालत नाही. पार्लमेंटमध्ये बोलावं लागतं… पाठपुरावा करावा लागतो… मुख्यमंत्र्यांकडे जावं लागतं… निधी आणावा लागतो… निधीची तरतूद करावी लागते… त्यासाठी अभ्यास करावा लागतो.. केवळ तुम आगे बढो, हम कपडे तुम्हारे कपडे संभालते अशी भूमिका घेऊन काही उपयोग नाही.. दूरदृष्टी ठेवून विकासाची कामे करावी लागतात असा सल्ला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस समर्थकांना दिला. नांदेड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या शोभानगर येथील शंकरराव चव्हाण अभ्यासिकेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी झालेल्या मानअपमानाच्या नाट्यानंतर अशोकराव हे मुख्य सोहळ्यात बोलत होते.
नांदेड महापालिका आणि जिल्हा नियोजन समितीच्या वतीने शोभानगर भागात अद्ययावत आणि वातानुकूलित अशी शंकरराव चव्हाण अभ्यासिका तयार केली आहे. या अभ्यासिकेसाठी जवळपास दोन कोटी रुपये खर्च आला आहे. या अभ्यासिकेचे लोकार्पण १४ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री, दिवंगत नेते शंकरराव चव्हाण जयंतीनिमित्त करण्यात आले. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या पत्रिकेत प्रारंभी नांदेडचे लोकनियुक्त खासदार वसंतराव चव्हाण यांचे नाव नव्हते. त्यांना निमंत्रणही दिले नव्हते. त्यामुळे या बाबीस त्यांनी हरकत घेत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानंतर महापालिकेने या कार्यक्रमाच्या पत्रिकेत त्यांचे नाव समाविष्ट करून त्यांना निमंत्रित केले. खासदार वसंतराव चव्हाण हे कार्यक्रमाला उपस्थित राहिले. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते या अभ्यासिकेचे उद्घाटन केले. त्यानंतर मार्गदर्शनपर भाषणांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाच्या स्टेजवर आपले नाव, आपला फोटो नसल्याचे सांगत काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांनी या कार्यक्रमावर आपण बहिष्कार टाकत असल्याचे घोषित करून तेथून ते निघून गेले. यावेळी काँग्रेस समर्थकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. ‘वसंतराव चव्हाण तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणा दिल्या. या घोषणाबाजीचा प्रत्येक वक्त्याने समाचार घेतला.
माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या कामाचा आढावा घेतला. आज नांदेडहून देशभरात विमानसेवा सुरू आहे. नांदेडहून देशातील सहा ठिकाणी विमानसेवा सुरू आहे. या विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नांदेडहून मुंबईसाठी विमान सेवा सुरू करण्यासाठी लवकरच प्रयत्न केले जातील. यातून नांदेडची आर्थिक सुबत्ता स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील आणखी विकास कामे शिल्लक आहेत. ते करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे सांगितले. दुसरीकडे विरोधकांनी केवळ विरोधाची भूमिका न घेता विकासाचा अजेंडा घेऊन काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. असदुलाबाद इनामी जमिनीचा प्रश्नही लवकरच मार्गी निघेल असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपाचे माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी शंकरराव चव्हाणांसारख्या देशपतळीवरील नेत्यांच्या नावे उभारण्यात आलेल्या अभ्यासिकेच्या उद्घाटन सोहळ्यात देगलूर नाक्याहून आणलेल्या काही भाडोत्रीकडून घोषणाबाजी करून घेणे, हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला. तर भाजपाचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी आपल्यालाही या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. परंतु आपण अभ्यासिकेचे उद्घाटन असल्यामुळे निमंत्रित नसतानाही आलो असे सांगताना केंद्रीय गृहमंत्री पदावर राहिलेल्या तसेच राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळलेल्या नेत्याच्या नावे ही अभ्यासिका होत आहे. समाजासाठी ती उपयुक्त ठरणार आहे. त्या कार्यक्रमाचे राजकारण करू नये, असे ते म्हणाले. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांनीही अभ्यासिकेचे आजच्या काळात मोठे महत्त्व असल्याचे सांगितले. नांदेडच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे, यापुढेही निधी आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रस्ताविकात माजी नगरसेवक किशोर स्वामी यांनी या अभ्यासिका उभारणीबाबतचा आढावा घेतला. माजी मुख्यमंत्री तथा तत्कालीन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी निधी उपलब्ध करून दिल्यानेच ही अभ्यासिका उभी राहू शकली असे त्यांनी स्पष्ट केले. प्रभागातील अनेक कामांसाठी त्यांनी निधीचीही मागणी यावेळी केली.यावेळी माजी महापौर शैलजा स्वामी, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, माजी आमदार अमरनाथ राजुरकर, डॉ. सचिन उमरेकर, माजी सभागृहनिता विरेंद्रसिंघ गाडीवाले, अमित तेहरा, संजय मोरे, देवानंद वाघमारे, उपअभियंता विश्वनाथ स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमावरून सुरू असलेले मानापमानाचे नाट्य पाहता मोठा पोलीस बंदोबस्त कार्यक्रम स्थळी तैनात करण्यात आला होता.
नांदेड महापालिका राजकारण्यांच्या दबावात… नांदेड महापालिका ही राजकारण्यांच्या दबावाखाली काम करत असल्याची टीका नूतन खासदार वसंतराव चव्हाण यांनी केली. प्रारंभी महापालिकेने कार्यक्रम पत्रिकेत आपल्या नावाचा उल्लेख केला नाही आणि आता इथं कार्यक्रम स्थळे महापालिकेने स्टेज उभारलेले असताना स्टेजवरील बॅनर वर निमंत्रितांचे नाव फोटो टाकण्यात आले नाहीत एकूणच महापालिकेच्या या कारभाराचा निषेध करत आपण या कार्यक्रमाचा बहिष्कार करीत असल्याचे स्पष्ट केले. या सर्व प्रकरणाबाबत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना विचारले असता खासदार वसंतराव आले कधी आणि गेले कधी हे आपल्याला माहित नाही असे सांगितले. तर काँग्रेसकडून करण्यात आलेल्या घोषणाबाजीचा त्यांनी चालत राहते,आगे बढो तर म्हणत होते, असे म्हणून विषयाला बगल दिली.