
नांदेड – किडनी निकामी झाल्यानंतर बहुतांश रुग्ण जीवनाची आशा जवळपास सोडून देतो.. कुटुंबीय, नातेवाईक चिंताग्रस्त असतात. पुढे रुग्णाला मुंबई -पुणे -हैदराबाद येथे उपचारासाठी हलविण्यात येतो. पण आता नांदेडमध्येही किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या केले जात आहे. किडनी तज्ज्ञ डॉ. शहाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तिसऱ्यांदा यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील गढी गावच्या सयाबाई या आईने किडनी देऊन आपल्या मुलाला पुनर्जन्म दिला. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर उमरखेड तालुक्यातील गढी गावातील डाखोरे परिवाराचे आनंदाश्रू थांबत नव्हते. डॉक्टर साहेब …आपले आयुष्यभर ऋण फिटणार नाहीत अशी भावना व्यक्त करीत होते.
नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहराजवळ असलेल्या गढी या गावातील अनिल भाऊराव डाखोरे मुंबई येथे मंत्रालयात जलसंपदा विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्यामुळे मागील एक वर्षांपासून नांदेड येथे त्यांच्यावर डायलिसिस सुरू आहे. पुढे ते श्री गंगा हॉस्पिटलमध्ये किडनी तज्ज्ञ डॉ .शहाजी जाधव यांच्याकडे उपचारासाठी आले. त्यांनी सर्व कुटुंबाला किडनी प्रत्यारोपणाबद्दल माहिती सांगितली. त्यावेळी आई सयाबाई डाखोरे यांनी आपल्या मुलास किडनी देण्यासाठी आनंदाने संमती दिली. त्यावेळी पुढील १५ दिवसामध्ये किडनी प्रत्यारोपणासाठी लागणाऱ्या सर्व तपासणी आणि कायदेशीर बाबीची पूर्तता करण्यात आली. डॉ.शहाजी जाधव यांनी किडनी प्रत्यारोपणासाठी २२ जूनची तारीख निश्चित केली. २२ जून २०२४ चा दिवस अनिल दुसरा जन्म देणारा दिवस ठरला. ‘आई म्हणजे आई असते दुधावरची साय असते’, गोठ्यातल्या वासराची माय असते हे मातृत्वाचं देणं त्यांना पुन्हा अनुभवायला मिळाले..आई सयाबाई यांच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण अनिलच्या शरीरात करण्यात आले. प्रत्यारोपण झाल्यानंतर दोघांच्याही प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाल्याने संपूर्ण कुटुंबाने सुटकेचा श्वास सोडला.
प्रत्यारोपण शस्त्रक्रिया किडनी ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. राजीव राठोड, डॉ. शिवराज टेंगसे, डॉ. प्रमोल हंबर्डे तथा प्रत्यारोपण तज्ञ डॉ. शहाजी जाधव, भूल तज्ज्ञ डॉ. जयश्री कागणे, डॉ. अंजली गोरे, डॉ. पवन, डॉ. सतीश राठोड, डॉ. सोनाली राठोड यांनी अथक परिश्रम घेऊन यशस्वी केली. श्री गंगा हॉस्पिटलचे संचालक अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. राजेश्वर पवार, डॉ. विजय कांगणे, डॉ. संदीप गोरे, डॉ.लक्ष्मीकांत भोपळे, डॉ. मनीषा मुंडे, डॉ. सुचिता पेक्केमवार, डॉ. नामदेव चौरे, डॉ. चंदू पाटील यांच्या संकल्पनेतून उभारलेले श्री गंगा हॉस्पिटल नांदेड परिसरातील किडनी रुग्णासाठी एक वरदान ठरत आहे.
किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ञ डॉ. शहाजी जाधव हे नांदेडच्या शिवाजीनगर येशील श्री गंगा हॉस्पीटल येथे कार्यरत आहेत. लखनऊ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टीटूट ऑफ मेडीकल सायन्स ही देशातील सर्वात मोठे किडनी प्रत्यारोपण करणारी संस्था आहे. तेथे डॉ. जाधव यांनी तीन वर्षे सेवा केली. या काळात त्यांनी दिडशेहून अधिक रुग्णांचे किडनी प्रत्यारोपण केले आहे. सम रक्तगट व भिन्न रक्तगट अशा अनेक गुंतागुंतीच्या व जटील किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. नांदेडमध्ये दोन महिन्यात तीन किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नांदेडच्या वैद्यक क्षेत्राची कीर्ती वाढविणारे ठरले आहे.
किडनी दान मिळेल रुग्णास जीवनदान – ङाॅ. शहाजी जाधव… बदलत्या जीवनशैलीमध्ये अचानक किडनी फेल होण्याचे निदान अंतिम टप्प्यात होते त्यामुळे रुग्ण व नातेवाईक घाबरून जातात. पण नातेवाईकांनी किडनी दान करण्याची तयारी दर्शविल्यास रुग्णाचे प्राण वाचतील व तो सामान्य आयुष्य जगू शकतो. शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत मिळते. त्यामुळे आर्थिक ताणही कमी होतो. त्यामुळे रुग्णाला नातेवाईकानी किडनी दान केल्यास रुग्णास जीवनदान मिळते, असे डॉ. शहाजी जाधव यांनी यांनी सांगितले.