प्रशासकीय

नांदेड जिल्ह्यात ४ लाख ७३ हजार महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये जमा होण्यास प्रारंभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, भोकर येथे आज जिल्हास्तरीय सोहळा

नांदेड – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत पात्र महिला महिलांच्या खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्याचे ३ हजार रुपये जमा होण्यास १५ ऑगस्टच्या दुपारपासून प्रारंभ झाला आहे. आधारलिंक असणाऱ्या सर्व पात्र खात्यामध्ये १७ ऑगस्टपर्यंत सर्वांना हा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील एकूण पात्र महिलांची संख्या ४ लाख ७३ हजार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये जिल्ह्यात ६ लाखाहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. अजूनही अर्ज दाखल करणे सुरू आहेत. आता पोर्टल कार्यान्वित झाल्यामुळे ज्यांनी अर्ज दाखल केले नसेल त्यांनी देखील तातडीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरातील महिलांशी संवाद साधून त्यांना ही योजना बंद होणार नाही अशी ग्वाही दिली आहे. सोबतच रक्षाबंधनाच्यापूर्वी सर्वांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे पैसे जमा होतील, असेही स्पष्ट केले आहे.

महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय समितीने ज्या ४ लाख ७३ हजार पात्र महिलांच्या अर्जाला मान्यता दिली आहे त्या सर्वांना हा लाभ पुढील काही दिवसात मिळणार आहे.या योजनेचा लाभ मिळालेल्या अनेक महिलांनी आपल्या मोबाईलवर मॅसेज दाखवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य शासनाचे आभार व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ही योजना पुढेही सुरू ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. रक्षाबंधनापूर्वी मिळालेल्या ओवाळणीबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

भोकर येथे आज योजनेचा जिल्हास्तरीय सोहळा…मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज शनिवारी बालेवाडी (पुणे) येथून होणार आहे. यानिमित्त नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता पालकमंत्री गिरीश महाजन, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, अन्य लोकप्रतिनिधी तथा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय समारंभामध्ये नांदेड जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना सहभागी होता यावे, यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे बालेवाडी येथील समारंभाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थी महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचाही यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात गौरव करण्यात येणार आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!